
जागतिक पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती खेळात जिंकले सुवर्ण पदक
मुंबई : तीन वेळा 'महाराष्ट्र केसरी' विजेते (Maharashtra Kesari Winner) अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी (Vijay Choudhari) यांनी भारतासाठी सोनेरी कामगिरी केली आहे. कॅनडाच्या (Canada) विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्यांनी जगज्जेतेपद काबीज केले.
जागतिक पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. उपांत्य फेरीत चौधरींचा सामना गतविजेता आणि संभाव्य विजेत्या जेसी साहोताशी झाला. त्यांनी अटीतटीच्या सामन्यात साहोताचा ११-०८ अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयानंतरच विजय यांचे जगज्जेतेपद निश्चित झाले होते. चौधरीने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बागली या गावचे विजय चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद, तसेच अनेक मानाच्या कुस्त्यांमध्ये बाजी आणि राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरींनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.