
प्रशासनाला जागे करण्यासाठी संघर्ष
बोईसर : मासवण ते नागझरी या रस्त्याचे काम ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्याची अक्षरक्ष चाळण झाली आहे. पाच वर्षांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी करणाऱ्या या भागातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी संघर्ष समिती आक्रमक झाली असून, १ ऑगस्ट या जिल्हा निर्मिती दिनीच मनोर-पालघर रस्त्यावरील मासवण फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाची (Rasta Roko Andolan) हाक देण्यात आली आहे.
खरेतर रस्ता, वीज, पाणी ही आजच्या घडीला नागरिकांच्या मूलभूत हक्काची साधने असताना जिल्ह्याच्या नऊ वर्षांच्या नवनिर्मितीनंतरही आजही पालघर तालुक्यातील मुख्य प्रवाहात येणारी घटके वंचित राहिलेले आहेत हे या माध्यमातून सिद्ध होत आहे. त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचेही आरोप समितीकडून करण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २०१६ साली मासवण ते नागझरी या एकूण ८ किमी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी जवळपास ५.८५ कोटींचा निधी मंजूर होऊन आर. के. सावंत या कंपनीला ५ वर्षांच्या दोष-दायित्त्व कालावधीसह रस्त्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटदाराकडून राजकीय पक्षांशी संबंधित काही स्थानिक ठेकेदारांनी उपकंत्राटे घेऊन २०१७ मध्ये या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली, मात्र सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य तसेच अंदाजपत्रकानुसार कामे न करताच या रस्त्याची अनेक कामे अपूर्ण ठेवली गेली. त्यामुळे अवघ्या वर्षभरातच या रस्त्याची दुरवस्था होऊन मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली होती.
ठेकेदाराने खड्डेमय रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी या भागातील स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि पालघर येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदने आणि तक्रारी केल्या, मात्र ठेकेदारकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. आर. के. सावंत या मुजोर ठेकेदारापुढे या विभागाचे अधिकारी अक्षरक्ष हतबल होताना दिसले.
मासवण-नागझरी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागझरी, निहे, लोवरे, काटाळे, खरशेत, वांदीवली आणि मासवण या गावातील नागरिकांना अक्षरक्ष नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मात्र, प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व संपूर्ण रस्त्यासाठी पुन्हा नव्याने १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात येऊन पावसानंतर काम सुरू करण्यात यावे, या मागण्यांसाठी मासवण-नागझरी संघर्ष समितीच्या माध्यमातून पालघर जिल्हा वर्धापनदिनी १ ऑगस्टला मासवण फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.