Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजRisk-management: रिस्क मॅनेजमेंट

Risk-management: रिस्क मॅनेजमेंट

  • संवाद: गुरुनाथ तेंडुलकर

वसईजवळच्या समुद्रात पोहायला गेलेल्या सात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू… सहलीसाठी धबधब्यावर गेलेल्या तीन तरुणी वाहून गेल्या… शोध सुरू आहे. फटाके लावताना आग लागून चार बालकांचा होरपळून मृत्यू… गिर्यारोहणासाठी गेलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कड्यावरून कोसळून दुर्दैवी अंत…

रेल्वेलाइन ओलांडताना आई आणि मुलगी ठार… विजेच्या खांबावर चढलेला युवक शॉक लागून जागीच दगावला…
गोविंदा पथकातील सहाव्या थरावर चढलेला शाळकरी मुलगा पडून मेला… राँग साईडने ओव्हरटेक करणारा स्कूटरस्वाराचा टँकरच्या धडकेनं मृत्यू…

तुम्ही म्हणाल हे काय चाललंय?

तर मी सांगतो की, या दररोजच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांच्या हेडलाइन्स आहेत. या आणि अशा प्रकारच्या इतर अनेक बातम्या आपण दररोज वाचतो. अलीकडे टीव्हीवर आणि सोशलमीडियावर पाहतो देखील. पण या बातम्या वाचून, पाहून आपण काय करतो? तर पुढच्या पाच मिनिटांत चक्क विसरूनही जातो. साहजिकच आहे म्हणा. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकारच्या अपघातात जायबंदी होणाऱ्या किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या माणसांची संख्या मोठी आहे. ही माणसं आपली कोणीही नसतात म्हणून आपण हळहळतो आणि विसरून आपल्या कामाला लागतो.
पण या सगळ्या बातम्यांतील एक समान धाग्याचा कधी कुणी विचार केलाय का? हे सगळे अपघात आपण नीट तपासून पाहिले तर त्यामागे एकच समान सूत्र आढळतं आणि ते म्हणजे हलगर्जीपणा… निष्काळजीपणा… काहीजण याला कौतुकानं बेफिकीर वृत्ती असंही म्हणतात.

ही बेफिकीर वृत्ती तरुण वयात शोभूनही दिसते. अन् हो तरुण वयातच कशाला कोणत्याही वयात माणसानं थोडं बेफिकीर-बिनधास्त असावंच की. सतत कोणत्या ना कोणत्या भीती-दडपणाखाली वावरत राहिल्यास माणसाला जीवनाचा खरा आनंद उपभोगता येणारच नाही. पायथ्याशीच बसून राहिल्यास शिखरावरून दिसणारा स्वर्गीय नजारा कसा दिसणार? पाण्यात पाय ओले होतील म्हणून किनाऱ्यावरच उभं राहिलं, तर लाटांत डुंबण्याचा आनंद कसा मिळणार?
स्वतः फटाके पेटवण्यातला आनंद दुसऱ्यानं लावलेले फटाके पाहण्यात नसतो. म्हणूनच जीवनातला आनंद लुटायचा असेल, तर थोडाफार धोका हा पत्करायलाच हवा. पण थोडा म्हणजे किती आणि फार म्हणजे किती? ही मर्यादा कुणी ठरवायची आणि कशी ठरवायची?

माझ्याच बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो. मॅनेजमेट कॉलेजमध्ये असताना मी एका सेमिनारला गेलो होतो. तिथं आम्हाला शिकवायला रामचंद्र अय्यर नावाचे एक ट्रेनर आले होते. या अय्यर सरांनी रिस्क मॅनेजमेंट शिकवताना टेबलावर सहा बाटल्या मांडल्या आणि म्हणाले, ‘या सहा बाटल्यात एकसारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आहेत. सगळ्या गोळ्यांचा रंग आणि आकार एकच असला तरी प्रत्येक गोळीची चव मात्र वेगवेगळी आहे. कडू… आंबट… तुरट… तिखट… खारट… आणि गोड… तुमच्या वाट्याला गोड गोळी येण्याचं प्रमाण हे सहापैकी एक म्हणजेच एक शष्टांश आहे.’

बोलता बोलता त्यांनी त्या सर्वच्या सर्व म्हणजे सहा बाटल्यांतील गोळ्या एका काचेच्या भांड्यात ओतल्या आणि चमच्याने वरखाली हलवल्या. सगळ्या गोळ्यांची एकमेकांत सरमिसळ झाली. आमच्यापैकी प्रत्येकाला एक एक गोळी घ्या, असं सांगण्यात आलं. आम्ही प्रत्येकाने एक एक गोळी उचलून तोंडात टाकायची आणि चोखून त्याची चव सांगायची असं ठरलं. प्रत्येकाने त्याप्रमाणे एक एक गोळी उचलून तोंडात टाकली आणि आपापल्या गोळीची चव सांगितली. ज्यांना आंबट आणि कडू गोळी आली होती त्यांचा चेहरा बघण्यालायक झाला होता. तिखट गोळी चघळणारे लोक पाणी पिऊन जीभेवरची तिखट चव कमी करण्याचा प्रयत्न करीत होते. गोड गोळी आलेले मात्र खूश होते.

अय्यर सर हसले… बोलता बोलता त्यांनी खिशातून आणखी एक बाटली काढली आणि त्या बाटलीतील एकच गोळी काढून आम्हाला दाखवून म्हणाले, ‘ही एक गोळी मी या सगळ्या गोळ्यांत मिसळतो. ही गोळी जरी या सगळ्या गोळ्यांसारखी दिसत असली तरी ही गोळी पोटॅशिअम सायनाईडची आहे. आता आपण हाच प्रयोग पुन्हा करायचा आहे. प्रत्येकाने मघासारखी एक गोळी उचलून तोंडात टाकायची आहे आणि चव सांगायची आहे. पण यात एक मोठा धोका आहे आणि तो म्हणजे त्यात मिसळलेल्या सायनाईड गोळीचा. चुकून जरी ती गोळी एखाद्याने उचलली आणि तोंडात टाकली, तर तो माणूस त्याची चव सांगेपर्यंतदेखील जिवंत राहणार नाही… हं तर करा सुरुवात…’

आम्ही सर्वजण स्तब्ध होऊन एकमेकांकडे आणि अय्यर सरांकडे पाहातच राहिलो. आमच्यापैकी एकाही विद्यार्थ्याची गोळी उचलायची हिंमत झाली नाही. थोड्या वेळापूर्वी उत्साहानं गोळ्या चघळणारे आम्ही सर्वजण आता मात्र गोळी उचलायला धजावत नव्हतो. अय्यर सारांनी सगळ्या गोळ्या नीट एका प्लास्टिकच्या पिशवीत गोळा केल्या आणि म्हणाले, ‘या सगळ्या गोळ्या आता वाया गेल्या आहेत. यांची नीट विल्हेवाट लावायला हवी. चुकून जरी कुणाच्या पोटात यातील सायनाईडची गोळी गेली, तर भीषण आपत्ती ओढावेल. खरंय ना?’ आम्ही सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या.
अय्यर सर पुढे म्हणाले, ‘पहिल्या वेळी तुम्ही सर्वजण गोड गोळीसाठी धोका पत्करायला तयार होता कारण समजा गोळी गोड नसली तरी फारसं काही बिघडलं नसतं. जास्तीत जास्त काय झालं असतं तोंड थोडावेळ आंबट किंवा कडू झालं असतं पण दुसऱ्या वेळी मात्र धोका पत्करण्यासारखा नव्हता. चूक झाली असती, तर साक्षात मृत्यू…’

पुढे अय्यर सरांनी आम्हाला मॅनेजमेंटमध्ये रिस्क किती प्रमाणात आणि कशा प्रकारची घ्यावी यावर बरंच काही समजावलं. बिझनेस डिसिजन घेताना. रिस्क ऍनालॅसिक कसं करावं हे शिकवलं. त्यानंतर पुढे मॅनेजमेंटमध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रात धोका पत्करताना किती आणि कोणत्या प्रकारचा असावा हे मी अनेकांकडून शिकलो. पण अय्यर सरांनी वेगवेगळ्या चवीच्या गोळ्यांच्या प्रयोगातून शिकवलेली रिस्क मॅनेजमेंट मी कधीच विसरू शकणार नाही…

उत्तुंग यश हवं असेल, तर थोडी रिस्क घ्यावीच लागते. मोठा नफा हवा असेल, तर थोडा लॉस सोसण्याचा धोका पत्करण्याची तयारी ठेवावी लागते. आपली मराठी माणसं रिस्क घ्यायला तयार नसल्यामुळे धंद्यात मागे पडतात. अशा प्रकारची वाक्य आपण वारंवार ऐकतो-वाचतो. रिस्क घ्यायलाच हवी. धोका पत्करायलाच हवा असं म्हणून फारशी माहिती नसलेल्या धंद्यात शिरून पार रसातळाला गेलेल्या आणि पुरते कंगाल झालेली अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. अधिक व्याज मिळेल या आशेने भलत्या-सलत्या ठिकाणी गुंतवलेले पैसे पुरते बुडालेल्या अनेक घटना आपल्याला ठाऊक असतील.

मुलीला अमेरिकेतलं सुशिक्षित मुलाचं स्थळ सांगून आलंय म्हणून मुलाची फारशी चौकशी न करता झट मंगनी पट ब्याह पद्धतीनं लग्न लावून दिलं जातं आणि पुढे अनेकदा त्या मुलीची फसवणूक झालेली असते. जन्मभर पश्चात्ताप करण्याची पाळी त्या मुलीवर आणि तिच्या पालकांवर येते. लेखाच्या सुरुवातीला वर्तमानपत्रातील काही अपघातांच्या बातम्या सांगितल्या होत्या. त्या अपघातांच्या कारणापैकी प्रमुख कारण हे अविचारानं केलेली कृती हेच होतं.

नीट पोहायला येत नसताना मौज करण्यासाठी अनोळखी ठिकाणी पाण्यात शिरण्याचा धोका पत्करायचाच नसतो. कोणत्याही धंद्या-व्यवसायाची नीट माहिती करून घेतल्याशिवाय, त्याचा नीट अभ्यास केल्याशिवाय त्या धंद्यात शिरायचंच नसतं. फटाके उडवण्याचा आनंद जरून घ्यावा पण त्याचबरोबर योग्य प्रकारची खबरदारी घ्यायलाच हवी. जिथे संभाव्य धोका अधिक मोठा असतो अशा ठिकाणी धोका न पत्करणंच शहाणपणाचं असतं नाही का? उगाचच भन्नाट वेगानं गाडी हाकण्यापेक्षा आपल्याला व्यवस्थित कंट्रोल होईल इतपत वेगानं गाडी चालवली तर थोडा उशीर होईल कदाचित, पण अपघात होणार नाही.

एक संस्कृत श्लोक आठवला म्हणून सांगतो.
सहसा विदधीत न कियाम् अविवेकः परम आपदा पदम् ।
वृणते हि विमृश्य कारिणं गुणलुब्धाः स्वयमेव संपदः।।

भावार्थ: अविवेकानं कार्य करून आपत्तीला आमंत्रण देणं यापेक्षा अधिक दुर्देवाची गोष्ट काय असू शकते. जी व्यक्ती विचारपूर्वक कार्य करते त्या व्यक्तीला लक्ष्मीमाता स्वतः आशीर्वाद देऊन सहाय्य करते. म्हणूनच कोणतंही कार्य हाती घेण्यापूर्वी त्यासंबधी विवेकपूर्ण विचार करायला हवा. त्यातील संभाव्य धोके ओळखायला हवेत. अविवेकानं केलेल्या कृतीतून नंतर होणारे नुकसान टाळायचे असेल, तर धोका कुठे आणि किती प्रमाणात पत्करायचा याची मर्यादा आपली आपणच ठरवायला हवी. खरंय ना?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -