Rain poems : काव्यरंग

Share

अरे… अरे… पावसा…

बदाबदा किती किती
कोसळतोय तू…
भिजविलास चिंबचिंब
आसमंत सारा तू…!!

सृष्टी भिजली सारी…
हरित तृणही शहारले…
डोंगरदऱ्यातूनही पाहा
झरे किती प्रसवले…!!

हिरव्यारानी गर्द शिवारी
झरझर नाले ओथंबले
लाल पिवळ्या हिरव्या
पानावर मोती विसावले…!!

किमया मोठीच न्यारी
सर्वत्र आनंदून बहरले…
रंगबिरंगी इंद्रधनूचे
तोरण नभोमंडपी सजले…!!

ऊन-पावसाच्या सरी
लपंडाव हे सुरू झाले…
आगमनाने आम्ही बालचमुही
पाहा खेळात रंगले…!!

– प्रा. अलका सानप, मुंबई.

पूर

मेघ अंबरी गर्जत आले जलधारा या कोसळती
वाऱ्यासंगे छप्पर भिंती नभी उडाल्या किती किती
मनात उठले काहूर आणि संध्याछाया भिवविती
नदी व नाले दुथडी भरूनी कसे बघा हो खळाळती…

शिरले पाणी गावभर असे घरभर सारे झाले हो
बघता बघता डोळ्यांदेखत सारे वाहत गेले हो
जीव वाचण्या प्रयत्न करता जो तो शोधे आडोसा
सुटू लागला धीर हळूहळू जगण्याची सुटली आशा…

ओसरल्यावर फक्त राहिल्या मागे त्याच्या आठवणी
नाश पावले होते सारे ज्याची केली साठवणी
सांग कुठे तू मला ईश्वरा सांग कुठे या संसारी
दैना झाली अमुची सारी भविष्य आहे अंधारी…

मनुष्यरूपी देव धावला संकटकाळी मदतीला
उभारण्याला सारे मिळूनी मदत करूया त्या विश्वाला
रक्षण करण्या जनतेचे ह्या नीट जपावे धरणांना
काळपरत्वे बदल घडावा गती मिळावी कामांना…

– मानिनी महाजन, मुंबई

सांत्वन…

आई रंगदेवते अगं सांग हे मी काय नवल पाहत आहे
जग दु:खात असता सावरणारी साक्षात देवी रडताहे…

लाडका पुत्र अभिनेता जयंत आज सोडून गेला मला
संध्याछायेतही जो करत होता अभिनय किती चांगला
वर्षानुवर्षे पाहत आलो ज्याची अप्रतिम नाट्य कला
तो मंच सावरणारा ‘सावरकर’ नाही दिसणार डोळ्यांला

विसरू कसा अंतू बर्वा व्यक्ती आणि वल्लीमधला
क्षणार्धात हरितात्याच्या भूमिकेत रंगमंच गाजवला
आणि कलावंतावीण अडणारा प्रयोगही सावरला
मद-धुंद तळीरामाने पिऊन पाजलाही एकच प्याला

रंगमंच म्हणाला, माते पूस गं डोळे रडत नको राहू
चल आनंद देणाऱ्या ललित कलांचा आस्वादही घेऊ
चित्रफितीमध्ये वसलेला अजरामर सावरकर पाहू
जो मरूनही कीर्तीरूपे उरला त्याला श्रद्धांजली वाहू

धाय मोकलून मोकलून रडते आहे आज रंगदेवता
सांत्वन करण्यास्तव अर्पण केली ही एक कविता
भावपूर्ण श्रद्धांजली…
– अपर्णा अनिल पुराणिक

‘आई’विना!

‘‘एक विचारू देवबाप्पा?
सांगशील का रे खरं;
‘मेल्या’नंतर माणसं सगळी
कुठे जातात बरं?’’ …१
‘‘दूर उंच डोंगर पल्याड, की
खोल कुठल्या खाईत?
तूच बोलावतोस त्यांना म्हणे
तुलाच असणार माहीत!’’ …२
‘‘बाबा सांगतात आई तुझी
गेलीय ‘देवाघरी’
आणि बोट दाखवतात
तिथे दूर कुठेतरी!’’ …३
‘‘मला सांग तुझा तरी
खरा खुर्रा पत्ता;
नाहीतर दे तरी नंबर
‘काॅल’ करते आत्ता!’’ …५
‘‘पाहिली नाहीय मी अरे
कशी असते ‘आई’;
साद घालू वाटते मला
आईऽ आईऽऽ आईऽऽऽ!’’ …६
‘‘एकदा तरी आईला
भेटू दे ना रे बाप्पा;
घट्ट घालीन गळामिठी
आणि गोड घेईन पापा!’’ …६
‘‘नाहीतर… तूच घेऊन चल न मला
तिथे तिच्या गावा;
आईच्या पदराखाली
मीही घेईन विसावा!’’ …७
‘‘मला बघून रडली, तर
पुसेन तिचे डोळे;
निजेन तिच्या कुशीत
आणि लडिवाळे!’’ …८
‘‘शपथ आहे बाप्पा तुला
अरे तुझ्या आईची;
‘आई’विना शून्य सारे
तुझी ‘दुनिया’ही मातीमोलाची?’’ …९
– पांडुपुत्र (प्रा. डाॅ. प्रकाश पांडुरंग गोसावी), खडकपाडा, कल्याण (प.)

पावसाची महती

पावसा पावसा,
तूच ओली-चिंब करितोस ना रे धरती
तुझ्यामुळेच शेतकरी पिकवितो ना रे शेती
शेतीतूनीच होते ना रे धन-धान्याची उत्पत्ती
धन-धान्ये खाऊनीच ना रे माणसे जगती…

नद्या-विहिरींना पावसाळ्यातच जरी आणतोस तू भरती
मानवा वर्षभर पुरविण्या पाण्याचा साठा
त्या करिती
पाण्याविना माणसे जगू शकतील का या जगती
जगण्या तूच करितोस ना मग मानवाची पाण्याची तृप्ती
तुझ्यामुळेच पिण्या पाणी, खाण्या अन्न मानवा मिळती…

तुझ्यामुळेच माणसे जगती ना रे या जगती
म्हणूनि तुझी कशी नि किती गाऊ मी महती
फारच तोकडी पडते पाहा रे माझी मती
पावसा मानवाच्या मतीसही आण ना रे तू भरती
जाणण्या, गाण्या तुझी,
त्यांच्या जीवनातील महती…
– दि. म. ऊर्फ पंडित आळशी

आभाळ फाटले

आभाळ इकडे फाटले आहे
तुमच्याकडे सांडतेय का?
खूप साऱ्या वर्षांनी
जखम ओली बोलतेय का?

ओघळणाऱ्या पागोळ्यांनी
आमची मडकी वाहून गेली
तळ्यात आल्या उधाणांनी
पाणी तुम्हास मिळतेय का?

खूप पसरलाय धूर येथे
सारं धुकं बोलतं आहे
झोंबत नाही डोळे इथे
बरं तुम्हास वाटतेय का?
पांढऱ्या पांढऱ्या झऱ्यांचे
अवशेष सगळीकडे दिसतायेत
डोंगराकडे आल्या नदीचे
स्वप्न तुम्हास दिसलेय का?

घमघमणारे गजरे फुलले
आमच्या मातीत दरवळले
अवचित एक मोगरा तिथे
खळ्यात तुमच्या
पडलाय का?
– संतोष खाडये (शोभासुत), गोरेगाव. 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

 

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

31 minutes ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

1 hour ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

1 hour ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

2 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

2 hours ago