Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाजLokmanya Tilak : तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी...

Lokmanya Tilak : तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी…

  • १ ऑगस्ट लो. टिळक पुण्यतिथीनिमित्ताने : अरविंद व्यं. गोखले, ज्येष्ठ संपादक

टिळकांनी कधीही कर्मकांडावर विश्वास ठेवलेला नाही. संध्या, देवपूजा या तेव्हाच्या रितीरिवाजाप्रमाणे आवश्यक असलेल्या गोष्टीही त्यांनी कधी मानल्या नाहीत. त्यांनी सामान्य जनतेत आपला देव पाहिलेला होता आणि त्यामुळे त्याच देवाची पूजा त्यांना अधिक भावत होती.

लोकमान्य टिळक यांच्याविषयी काहीही न वाचलेले आणि त्यांच्याविषयी कसलाही अभ्यास नसलेले टिळकांना दूषण देत असतात. त्यांना कितीही समजावून सांगितले तरी त्यांच्या मतांमध्ये कितपत फरक पडेल मला माहिती नाही, कारण त्यांचे मत बनलेले असते आणि त्यास अनेकांचे हातभार लागलेले असतात. टिळकांनी कधीही कर्मकांडावर विश्वास ठेवलेला नाही. संध्या, देवपूजा या तेव्हाच्या रितीरिवाजाप्रमाणे आवश्यक असलेल्या गोष्टीही त्यांनी कधी मानल्या नाहीत. त्यांनी सामान्य जनतेत आपला देव पाहिलेला होता आणि त्यामुळे त्याच देवाची पूजा त्यांना अधिक भावत होती. त्यांचे आधीच्या काळातले अगदी जवळचे स्नेही आणि सहाध्यायी गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांच्या मतांशी फारकत होताच त्यांच्याविषयी आपले प्रांजळ मत दिले होते आणि म्हटले होते की, टिळक हे वस्तुत: सुधारकच आहेत, पण त्या काळातल्या सनातन्यांना इंग्रजांच्या विरोधात उभे करण्याच्या प्रयत्नात ते सुधारकांपासून दूर राहिले; परंतु सनातन्यांनीही त्यांना आपले मानले नाही.

टिळक हे कडवे धर्मवादी होते का? तर तसेही नाही. धर्माचे त्यांना वावडे अजिबात नव्हते, पण धर्म समजून घेण्यात सर्वच समाज कमी पडत असल्याचे त्यांचे मत बनलेले होते. त्यांनी धर्माची केलेली व्याख्याच त्यासाठी पुराव्यादाखल देता येईल. ते धर्माविषयी म्हणाले होते की, “आपल्या परंपरांना आणि मूल्यांना धारण करतो तो खरा धर्म.” आता हेच त्यांचे वाक्य उलगडून सांगायचे, तर हा धर्म मग कोणताही असू शकेल, असेच त्यांना सुचवायचे आहे असे स्पष्ट दिसते. १८९६ च्या दुष्काळात सरकारने तयार केलेल्या ‘फेमिन कोडा’ची माहिती सार्वजनिक सभेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा निर्णय त्यांनी घेतला. फेमिन कोड हे इंग्रजीत असल्याने ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कसे, ही समस्या होती. त्यांनी त्या इंग्रजी फेमिन कोडाचे भाषांतर करून त्यास केसरीतून प्रसिद्धी तर दिलीच, पण तो सगळा प्रसिद्धीचा टाइप फिरवून (वृत्तपत्रीय पानांमधून तो पुस्तकाच्या पानांच्या आकारात) त्याच्या पुस्तिका तयार केल्या आणि त्या गावोगाव स्वत: जाऊन वाटल्या. काही ठिकाणी त्यांनी सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांना पाठवले, काही ठिकाणी ते स्वत: गेले आणि शेतकऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना या काळात त्यांनी पाठबळ दिले. दुष्काळाचा फटका सर्व समाजाला बसलेला होता. त्यांना मदतीची आवश्यकता होती. त्यांच्या अडीअडचणी त्यांनी स्वत: ऐकल्या आणि त्यांच्या गाऱ्हाण्याचे पत्रक तयार करून ते त्यांनी सरकारकडे पाठवून दिले. दुष्काळाची ही भीषण अवस्था पाहण्यासाठी त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य आणि मजूर पक्षाचे नेते केर हार्डी यांना भारतात पाचारण केले आणि ते अल्यानंतर त्यांना बरोबर घेऊन त्यांनी दुष्काळी भागाचा दौराही केला. ब्रिटिश पत्रकार डेव्हिड नेव्हिनसन भारतात आले असता, त्यांनी टिळकांची भेट घेऊन या दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याची दैना होऊ नये, या भावनेतून त्यांचे हे सगळे प्रयत्न होते.

दुष्काळाचा फटका सर्व समाजाला बसलेला होता. त्यांना मदतीची आवश्यकता होती. त्यांच्या अडीअडचणी त्यांनी स्वत: ऐकल्या आणि त्यांच्या गाऱ्हाण्याचे पत्रक तयार करून ते त्यांनी सरकारकडे पाठवून दिले. सोलापूरमध्ये वीणकरांचा एक मोठा वर्ग या दुष्काळाने होरपळलेला होता. त्यांचा धंदाच बसलेला होता. अशा स्थितीत त्यांना मदतीची गरज होती. त्यांना धंद्याची फेरमांडणी करता यावी यासाठी सरकारने भांडवल पुरवावे, अशी मागणी टिळकांनी केली. सरकारने ती फेटाळल्यावर टिळक स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी ‘वीव्हर्स गिल्ड’ अशी संस्था स्थापन केली. धनिक व्यापारी आणि जुन्या गिरणीवाल्यांचे त्यांनी साहाय्य घेतले. वीणकरांना सूत पुरवून त्यांच्याकडून माल तयार करवून घ्यायचा, तो वीणकरांनी ‘वीव्हर्स गिल्ड’कडे सुपूर्द करायचा आणि व्यापाऱ्यांनी तो ‘वीव्हर्स गिल्ड’कडून खरेदी करायचा, असे चक्र चालू झाले. यात ‘वीव्हर्स गिल्ड’ने किंवा सार्वजनिक सभेने आपला कोणताही नफा घेतला नाही. या गिल्डमुळे वीणकरांवर दुष्काळी कामावर खडी फोडायला जाण्याचे संकट टळले आणि त्यांना भरपूर काम मिळून त्यांची हलाखीची स्थिती सुधारली.

यात बंगालच्या वीणकरांनी महाराष्ट्रातल्या विशेषत: सोलापूरच्या वीणकरांबरोबर एकमेका साह्य करू, अशी भूमिका ठेवलेली होती. १९०७ मध्ये सुरतेला काँग्रेस पक्ष फुटला आणि टिळकांना काँग्रेसबाहेर जावे लागले, याचे वैषम्य बंगालच्या वीणकरांना अधिक झाले. म्हणून १९१४ मध्ये जेव्हा मंडालेला शिक्षा भोगून टिळक परतले, तेव्हा त्यांचा सत्कार आधी लखनऊ काँग्रेसमध्ये आणि नंतर ते जेव्हा कलकत्त्यास गेले तेव्हा केला गेला. स्थानिक वीणकरांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. पुण्यात १८९७ मध्ये प्लेगची साथ आली असता लोकमान्यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखात नागरिकांनी कोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे, याविषयी लिहिलेले होते. त्यातच त्यांनी आपापली घरे कशी स्वच्छ ठेवता येतील, हे पाहण्यास सांगितले होते. आपल्या घरांना बाहेरून सफेदी करून घेऊन घरातली घाण काढून आणि ती शक्यतो जाळून टाकल्यास संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले होते. प्लेगच्या साथीत चांगले काम व्हावे या उद्देशाने इंग्रज सरकारने पुण्यात तेव्हा वॉल्टर रँड नावाचा प्रशासक नेमला. त्यावेळीही टिळकांनी या नव्या कारभाऱ्यास सहकार्य करण्याविषयी सुचविले होते.

याच काळात टिळकांच्या असे लक्षात आले की, प्लेग झालेली व्यक्ती फार फार तर एक-दोन दिवसांचीच पाहुणी असते. त्यानंतर ती दगावते. प्लेगसाठीचे उपचार जसे व्हायला पाहिजेत तसे होत नाहीत, असे पाहून त्यांनी तेव्हाच्या लकडी पुलाच्या (आताच्या संभाजी पुलापलीकडे) एक नवे हॉस्पिटल उभे केले. ते त्यांनी स्वत:च्या हिमतीवर उभे केले होते. त्यात त्यांनी उपचारार्थ आलेल्या रुग्णाला इतकेच नव्हे, तर त्याच्याबरोबर आलेल्या नातलगांना नाश्ता, तसेच दोन्ही वेळचे जेवण देण्याची सोय केलेली होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्या हॉस्पिटलचे नाव जरी हिंदू हॉस्पिटल असे असले तरी अठरापगड जातीच्या धर्माच्या लोकांसाठी ते खुले होते. आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे मुकाबला करण्यास टिळकांनी सांगितले.

अशा या काळात जेव्हा रँडचे शिपाई गल्लो-गल्ली, रस्तोरस्ती गुंडगिरी करत हिंडत आणि स्त्रियांचे जांघे आणि काखा यामध्ये कुठे प्लेगची गाठ नाही ना, हे भर रस्त्यात त्यांची लुगडी वर करायला लावून आणि चोळ्या काढायला लावून तपासणी करत, तेव्हा पुणेकर चिडले. टिळकांनी रँडला भेटून “तुझ्या सोल्जरांना आवर” असे सांगितले, तरी त्याने त्यांना जुमानले नाही. तेव्हा रँडच्या विरोधात पुणेकर पेटून उठले. टिळकांनी सर्व समाजाला “गाव सोडून जाऊ नका आणि परिस्थितीला नेटाने तोंड द्या” असे आवाहन केले. अशा वेळी सुशिक्षितांपैकी बरेचसे बायका-मुलांसह गाव सोडून अन्यत्र निघून गेले. मात्र टिळकांचे हे आवाहन गावातल्या गोरगरिबांनी, अशिक्षितांनी मानले आणि ते पुण्यातच राहिले. पुण्याबाहेरही जुलूम-जबरदस्ती होत होती, पण तिथे समाज संघटित होता. अडचणीच्या प्रसंगी सर्व समाज एकत्र राहावा आणि त्याने सरकारी जुलमाचा तितक्याच तिखटपणे प्रतिकार करावा, ही टिळकांची इच्छा होती, तसेच त्यांनी समाजाला काँग्रेसचे स्वयंसेवक बनून पीडितांना मदत करण्यास सांगितले.

सुशिक्षितांनी मोठ्या प्रमाणात पलायन केलेले असल्याने बहुसंख्य अडाणी आणि अशिक्षित समाज टिळकांच्या पाठीशी उभा राहिला. “हल्ली जी रँडशाही सुरू आहे, ती केव्हाही फार काळ टिकणे शक्य नाही व लोक कितीही गरीब असले तरी ते हा त्रास एकसारखा सोसून घेतील, असे आम्हास वाटत नाही. याकरिता प्लेगने मेलो तर मेलो, असे वाटू देण्यापर्यंत लॉर्ड सँडहर्स्ट यांनी त्यांचा अंत पाहू नये”, असेही टिळकांनी लिहिले. शेवटी त्यांनी लिहिले की, “गावाबाहेर राहून आमच्या पुढाऱ्यांनी अधिक काय केले असा जर कोणी प्रश्न केला तर मग आम्ही काय उत्तर देणार?… मग आम्ही लोकांचे पुढारी कसले?… ज्या आळीत जावे ती आळी ओसाड. निदान तेल्यातांबोळ्यांखेरीज तिथे कोणीच दृष्टीस पडत नाही.” टिळकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन आळी-आळीमध्ये तेलीतांबोळी राहिले. पण सुशिक्षित परागंदा झाले, त्यावर टिळकांनी हे भाष्य केले होते. याच तेली, तांबोळी आणि कोष्टी तसेच अन्य मागासवर्गीयांनी टिळकांचे स्वयंसेवक बनून त्यांना मदत केली, इतकेच काय. पण टिळकांनी उभारलेल्या स्मशान स्वयंसेवक संघासाठीही यातल्या काहींनी त्यांना मदत केली. प्लेगने मृत्युमुखी पडलेल्यांना स्मशानापर्यंत नेऊन त्यांचा दहनविधी करण्यापर्यंत सर्व तऱ्हेची मदत या स्वयंसेवकांकडून केली जात असे. त्यासाठी मोफत लाकूडफाटा पुरवण्याचे काम याच संस्थेकडून केले जात असे. मृतदेह स्मशानापर्यंत नेण्यासाठी तेव्हा कोणतेही साधन उपलब्ध नसताना या मंडळींकडून त्या मृतदेहाची तिरडी बांधून किंवा हातगाडीवर ते प्रेत बांधून ते स्मशानापर्यंत घेऊन जाण्याचे कामही हेच स्वयंसेवक करीत असत. त्यांना मार्गदर्शन अर्थातच टिळकांचे होते. त्यामुळे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी हेच त्यांचे बिरुद ठरले.

(लोकमान्य टिळक यांच्याविषयी प्रस्तुत लेखकाच्या आगामी ‘अष्टावधानी लोकमान्य’ या ग्रंथातील ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ या प्रकरणाचा हा आहे संक्षिप्त भाग…)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -