मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
कवयित्री सरोज जोशी यांचे ‘आई’ नावाचे पुस्तक वाचत होते. जेमतेम ८० पानांचे छोटे पुस्तक. आई या दोन अक्षरी शब्दांचा विविध अंगांनी त्यांनी शोध घेतला आहे. आदिम संस्कृतीच्या प्रांरंभिक पर्वात स्त्री ही सर्वधारक, सर्वपोषक शक्ती होती हे सूत्र या विवेचनामध्ये आहे. आदिशक्ती, धरित्री, विश्वजननी ही स्त्रीची रूपे तिची विलक्षण शक्ती अधोरेखित करणारी! त्यानंतरचा पुरुषप्रधान वर्चस्वाचा प्रवास सरोजताई रेखाटतात! तो रेखाटताना स्त्री व पुरुष यांनी एकमेकांना पूरक कसे असायला हवे, याची विविध उदाहरणे त्या देतात.
नुकतीच घडलेली भयंकर घटना! मणिपूरमध्ये स्त्रियांचा सन्मान पायदळी तुडवला गेला. काळाच्या या टप्प्यावर माणुसकीला कलंक ठरणारे हे कृत्य संतापजनक आहे. बाईच्या शरीराचे धिंडवडे काढणारी क्रूरता ही आपली संस्कृती नव्हे. कालचक्र नेमके कुठल्या दिशेला फिरते आहे? आज सरोज जोशी या जगात नाहीत पण त्यांचे ‘आई’ हे पुस्तक वाचताना कालचक्राचा धागा उलट-सुलट फिरत राहिला. साहित्यातील आईच्या विविध प्रतिमांचा शोध त्यांनी पुस्तकातील स्वतंत्र प्रकरणातून घेतला आहे. संतसाहित्यात ‘माऊली’ या शब्दाचे महत्त्व अपार आहे. कवी यशवंतांची आई ही कविता पिढ्यान् पिढ्या अमर झालेली आहे.
आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी…
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !
आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातली ‘आई’ ही व्याकुळ करणारी हाक हृदय हेलावून टाकते. फ. मु. शिंदे यांची आई ही कविता अभ्यासक्रमातली मुलांची सर्वात लाडकी
कविता आहे.
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही, उरतही नाही……
कवी किती कमी शब्दांत आशय व्यक्त करतो. मर्ढेकरांच्या ‘थांब उद्याचे माऊली तीर्थ पायाचे घेईतो’ हे शब्द स्त्रीच्या मातृरूपाला उंचीवर नेऊन ठेवतात. भरभरून देणाऱ्या स्त्रीची सजीव प्रतिमा ‘पुष्कला’ या कवितेतून व्यक्त होते. संहिता ही विंदा करंदीकरांची कविता स्त्रीरूपांचा फेर धरण्याची किमया करते. माधव ज्युलियनांची वात्सल्यसिंधू आई, पद्मा गोले यांची ‘बाल चाललासे रणा’ या कवितेतील वीरमाता, नारायण सुर्वे यांच्या ‘मास्तर तुमचंच नाव लिवा’ या कवितेतली मुलाला बापाचे नाव न देऊ शकणारी आई, गोविंदाग्रज यांची ‘राजहंस माझा निजला’ ही कविता अशा विविध कवितांचे संदर्भ आठवत राहतात.
कुसुमाग्रजांची ‘राजहंस माझा निजला’ ही कविता अतिशय वेगळी आहे. ज्युलियनांच्या कवितेतील पुत्राकरिता शोक करते, तर कुसुमाग्रजांच्या कवितेतली गरीब घरातली आई, कुजलेल्या धान्याची पोती व्यापारी वाटत सुटला आहे, हे ऐकताच मुलाचे कलेवर तसेच टाकून तिथे धावत सुटते. तिच्या इतर चिमण्या बाळांकरिता त्या क्षणी त्या कुजलेल्या धान्याचे मूल्य अधिक असते. परिस्थितीमुळे मुलाच्या मृत्यूचे दु:खही न करू शकणारी अगतिक आई विसरता येत नाही.
आईच्या रूपाशी जोडले गेलेले अन्य अनुबंध सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. विधवा माता, कुमारी माता, सरोगेट मदर, सावत्र आई, दत्तक मुलाची माता ही स्त्रीरूपे व त्यांच्याशी निगडित सामाजिक पैलू मराठी साहित्यातून आले आहेत. कुसुम मनोहर लेले, आई रिटायर होते, शांतता कोर्ट चालू आहे, या नाट्यकृती, लोकसाहित्यातील कथाकहाण्या ‘आई’ शब्दाचा अवकाश अधिक विस्तारतात. एका पुस्तकाचे केवळ निमित्त! आई या दोन अक्षरी शब्दाचा मराठीतील पैस समजून घेताना ‘ज्याने ‘आई’ हा शब्द शोधला तो जगातला सर्वश्रेष्ठ संशोधक’ या आशयाची कुसुमाग्रजांची कविता आठवत राहते.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…