Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजLoneliness : एकाकीपणा...

Loneliness : एकाकीपणा…

  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

एकांत आणि एकाकीपण यात फरक आहे. एकांतवास हा व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असतो, तर एकाकीपणा म्हणजे सोबत कुणी असतानाही काही विशिष्ट कारणांमुळे एकटे वाटणे. प्रत्यक्ष भेटून बोलण्याचा अभाव वाढल्याने एकाकीपणाची समस्या वेगाने वाढत आहे.

एक वर्षाचा सुखी संसार! अचानक कारगील युद्ध सुरू झाले आणि माझ्या पतीला युद्धावर जावे लागले. दुर्दैवाने तीच शेवटची भेट ठरली. माझ्या पतीची आणि बाळाची नजरभेटही होऊ शकली नाही. मी निराधार झाले. एकाकीपण आले. प्रजासत्ताकदिनी पतीचे मरणोत्तर वीरपदक स्वीकारताना स्वतःला सावरले, मी वीरपत्नी होते. माझ्या पतीला वीरगती मिळाली होती आणि मला आता वीरमाता व्हायचे आहे. आलेला एकाकीपणा मुलासाठी बाजूला करीत मी निर्णय घेतला माझ्या बाळाला शूर सैनिक बनविणार!

अशा अनेक उमलत्या वयाच्या शहीद जवानांच्या कहाण्या वाचताना त्यांचे कुटुंबीय एकाकीपण कसे निभावत असतील? दुसऱ्या बाजूला आज शहरात वाढलेली विभक्त कुटुंब पद्धत, जो तो आपल्या खोलीत फोनवर, मोबाइलमुळे सामूहिक दूरदर्शन पाहणेही कमी झाले. दारबंद संस्कृती, शेजाऱ्यांशी मर्यादित संवाद किंवा ओळखही नाही. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त, आजूबाजूची परिस्थिती जाणूनही सारे समाजापासून दूर जात आहेत. फोनवरच भेटतो, बोलतो. कोणत्याही भेटवस्तूपेक्षा सर्व नात्यांत प्रत्यक्ष भेटून बोलणे खूप गरजेचे आहे. याचा अभाव वाढल्याने एकाकीपण ही आज जागतिक समस्या वेगाने वाढत आहे.

एकाकीपण : अकेला होनेकी अवस्था! व. पु. काळे लिहितात, ‘परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण!’ मनुष्य समाजशील असल्याने पुरेसा सामाजिक संवाद न मिळाल्यास, दिवसभर घरात बंदिस्त राहिल्यास (ज्येष्ठ नागरिक, नोकरी करणाऱ्यांची मुले) एकाकीपणाची भावना येते. दीर्घकालीन एकाकीपणामुळे हृदयविकार, अल्मायझरचा त्रास उद्भवतो. एकांतवास हा व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असतो. स्वतःहून निवडल्यामुळे तो सकारात्मक आणि सृजनशील असतो. उदा. शास्त्रज्ञ, कलाकार…

परंतु कोरावर वाचलेले – मला एकट्याने गाणी ऐकायला, पुस्तक वाचायला, जेवण करायला, चालायला आणि शुक्रवारची रात्र माझ्या स्वतःसाठी काही विचार, योजना आखण्यासाठी एकट्याला मोकळं राहायला आवडते. पण जेव्हा मी आईसोबत लहान मूल, प्रियकर-प्रेयसींना, नव्या जोडप्यांना, मित्रांना मजा करताना पाहतो, तेव्हा मी माझ्या एकांताचा तिरस्कार करतो.

एकाकीपणात दुसऱ्याची कंपनी हवी असते. समाजात पद, पैसे, प्रतिष्ठा, राहणीमान याला अवास्तव महत्त्व दिल्याने यात न बसणाऱ्यांना नोकरीत, समारंभात, सोसायटीत, नातेसंबंधात दाद न देता पाठ फिरवली जाते, दुर्लक्ष केले जाते. इच्छा नसतानाही तो इतरांपासून अलिप्त होतो. एकटा पडतो. त्यानंतर अशा कार्यक्रमांपासून तो दूर राहतो.

१. माझ्याशी कोणी बोलत नाही, मैत्री करत नाही, माझ्याकडे काहीच नाही का? मला माझे आयुष्य तुरुंगासारखे वाटते.

२. ‘खूप एकटं केलं मला माझ्या लोकांनी, समजत नाही नशीब वाईट की मी?’ अशी स्वगते ऐकतो. माणूसच माणसाला एकाकीपणात ढकलतो. मग त्याच्यामध्ये एकाकीपणाची भावना निर्माण होते. समाजांत मिसळा, इतरांशी जुळवून घ्या हे सल्ले फोल ठरतात.

एकाकीपणाची काही कारणे – परदेशात गेलेली मुले आणि त्यांचे भारतातील पालक, बालवयात/तारुण्यात वाट चुकलेले, व्यसनाधिन झालेली मुले व त्यांचे पालक आणि घरात दोन पिढ्यांच्या मतभेदातून निर्माण होणार मुले व त्यांचे पालक यांत निर्माण होत असलेल्या दोघांच्या एकाकीपणाची संख्या हा एक आजचा ज्वलंत प्रश्न! असे म्हणतात, १६ ते २४ वर्षांची मुले एकटे आणि एकाकीपणा अनुभवत असतात.

याशिवाय १. सोशल मीडियाचा वाढता वापर, २. उच्च पदावर असल्यामुळे, ३. मोठ्या आर्थिक फसवणुकीतून कर्जबाजारी झाल्यामुळे, ४. पराकोटीचे कौटुंबिक, व्यावसायिक वैमनस्य, ५. जवळच्या माणसाचे मृत्यू, ६. शाळेत-घरात-मित्रात- भावंडांत एखादा दबलेला पाहतो, या साऱ्यामुळे पण एकाकीपणा येते.

कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे घरातला रोजचा सवांद, बाहेरचाही संबंध तुटल्याने आलेला एकाकीपणाचा अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला, त्यांत काहींचा अंतही झाला. एकाकीपणात एक अज्ञात भीती असते. त्यातून जीवनाचा प्रकाश मंद होत जातो. तरी हा एकाकीपणा काही काळापुरता असतो. एकाकीपणा ही भावना असल्याने मनाने घेतले, तर सहजपणे त्यावर मात करता येते. एकाकीपण बाजूला करणं ही आपली निवड आहे.

एकाकीपणावर मात करण्यासाठी महत्त्वाचे दोन उपाय – १. जास्त विचार करू नका, २. हालचाल करा आणि मेडिटेशन.
याच उपायाची तीन उदा. – १. प्रचंड ताकदीने आपल्या अनेक स्वातंत्रसैनिकांनी भोगलेला कारावास! २. पॅरिसच्या गुन्हेगार जगतातील पॉपिलॉन आयुष्यभराच्या जन्मठेपेत एकांतवासात मन खंबीर करून, फक्त पाच पावलांच्या अंधाऱ्या कोठडीत चौदा तास चालण्याचा व्यायाम करीत होता, ३. एक विद्यार्थी शिक्षणासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये काही दिवस आधीच आल्याने दोन दिवस एकटेपणाचा आनंद घेतला. एकाकीपणा आपला वाढतोय, हे लक्षात येताच हालचालीसाठी कॅम्पसमध्ये फिरायला बाहेर पडला. सारे बंद. सुदैवाने बास्केटबॉलच्या मैदानात बॉल दिसताच एकटा रोज खेळत राहिला. मुख्यतः स्वतःला पूर्णपणे व्यस्त ठेवा. स्वतःजवळचे कौशल्य अपडेट करीत आजूबाजूच्यांना सामावून घ्या. तुमचे कौशल्य ही तुमची नवी ओळख ठरेल. अनोळखी व्यक्तीशीही संवाद साधा.

आज अनेकांची मुलं परदेशी, जोडीदार नाही असे एकेकटे बहिणी-बहिणी किंवा सोबतीला केअरटेकर ठेवतात. मित्रांना घरी बोलवत, वेगवेगळ्या लोकांसोबत पर्यटन, विविध समारंभ, चित्रपट-नाटक-हॉटेलचा आस्वाद घेत जो येईल, तो दिवस मजेत घालवत, आपलं उरलेलं जगणं समृद्ध करतात. याच एकाकीपणावर, १. ‘एकाकीपणाची शंभर वर्षे’ ही स्पॅनिश लेखकाची, मनीषा तनेजा अनुवादित (विस्मित करणारी) नोबेल पारितोषक कादंबरी, २. आजच्या कनेक्टिव्हिटीच्या युगात आपण आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यापासून विचलित होत आहोत. यावरचा ‘माणिकब्बर मेघ’ हा बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनंदन बॅनर्जी यांनी स्वतःच्या एकाकीपणातच केले होते, ३. शौनक आणि राहुल याचे गाणे, “आज सरे मम एकाकीपण…”

महत्त्वाचे हे लक्षात घ्या, आपण ‘आपले’ आयुष्य जगतो म्हणून एकाकीपण येते. एकाकीपणा ऐच्छिक, स्वतःच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. एकाकीपणातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे मी समाजासाठी काय करू शकतो? तुमचे लक्ष्य एका मोठ्या उद्देशाकडे वळवा. संपूर्ण तुमची दिशाच बदलेल. ज्या समाजात सेवेची मूल्य शिकवली जातात, सामाजिक सहकार्याची भावना स्थिरावते, तेथे आत्महत्या, एकाकीपणा कधीच डोकावत नाही.

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -