Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजKeshavraj Mandir : लोकदैवत केशवराज मंदिर

Keshavraj Mandir : लोकदैवत केशवराज मंदिर

  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर

गर्द झाडीत वसलेलं केशवराज हे मंदिर साधारण १००० वर्षे जुने असून हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले, अशी आख्यायिका आहे. मंदिर पेशवेकालीन असून श्री विष्णूची सुंदर मूर्ती गाभाऱ्यात आहे. हे दैवत श्री लक्ष्मी केशवराज म्हणूनही परिचित आहे. केशवराजाचे दर्शन घेतल्यानंतरही परिसरातून बाहेर पडावेसे वाटत नाही. निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार एकदा तरी अनुभवायला हवा.

कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं? असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्वर’ असं सार्थ नाव मिळालंय. दापोली ते आंजर्ले या सुमारे २६ किलोमीटरच्या रस्त्यावर मुरुड, हर्णे आणि आंजर्ले किनारे आहेत. मुरुडपासून डावीकडे वळल्यास करदे बीचवर जाता येतं. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामुळेही दापोलीचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं आहे.

कोकणातलं थंड हवेचं ठिकाण, याव्यतिरिक्त दापोलीची ओळख प्रसिद्ध प्राचीन आणि ऐतिहासिक ठेव्यांमुळंही जगभर पसरलेली आहे. पन्हाळे काझी इथल्या लेण्या, उन्हवरेतलं गरम पाण्याचं कुंड, दाभोळची खाडी, हर्णेजवळचा सुवर्णदुर्ग आणि त्याच्या रक्षणासाठी बांधलेले कनकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवा किल्ला, मुरुडचं दुर्गादेवी मंदिर, दापोलीजवळचं केशवराज मंदिर, चंडिका मंदिर आदी मंदिरे आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. मुरुडचा समुद्रकिनारा दापोलीपासून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर आहे. किनाऱ्याजवळच दुर्गादेवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचं छत पिरॅमिडच्या आकाराचं आहे.

दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज (विष्णूचे) मंदिर आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता; आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. मात्र श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की, वरच्या कठड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इ. वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते.

गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण १००० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून १२ महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती, तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णू मूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णू मूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी चार आयुधे आहेत. हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले, अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू-विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी, गावाबाहेर, निर्जन ठिकाणी असतात; परंतु केशवराज मंदिर हे या गोष्टीस अपवाद आहे. या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून उत्सव सुरू होतो, तो त्यानंतर सुमारे ५ दिवस चालू असतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. दुसऱ्या एकादशीपासून ३ दिवस उत्सव असतो, तर त्रयोदशीला प्रसाद असतो. देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल यांचे केशवराज कुलदैवत आहे. याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या परिसराला डोळ्यांसमोर ठेवून श्री. ना. पेंडसे या महान लेखकाने ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी लिहिली तो हाच परिसर होय. गारंबीचा बापू या चित्रपटात लाकडी पुलापासून ते नारळी-पोफळींच्या बागांपर्यंतचे चित्रीकरणदेखील या परिसरातले आहे. दापोलीला येणारा पर्यटक येथे आवर्जून भेट देतो.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -