विश्वाच्या निर्माणकर्त्याच्या अमर्याद शक्तीचा प्रत्यय आल्यावर मानवी मनाला त्याची स्तुती, स्तवन करण्याचा मोह होतोच. पण भारताबाहेर परमेश्वराची कल्पना केवळ पुरुष रूपातच केलेली दिसते. त्यामुळे अभारतीय मुळाच्या धर्मात देवाची स्तुती आहे, ती त्याचे पुरुष रूप गृहीत धरूनच! बायबलच्या जुन्या करारात देवाची स्तुती करणारी १५० स्तोत्रे आहेत. त्यातले क्रमांक १५०चे सुंदर स्त्रोत्र मात्र बरेचसे भक्ती पंथाकडे झुकणारे आहे.
अमीर खुसरोंच्या आगमनानंतर उर्दूतही अशाच भक्तिरसाच्या कव्वाल्या आणि नाती लिहिल्या गेल्या. मात्र भारतीय भाषा सोडता जगातल्या कोणत्याच भाषेत परमेश्वराच्या स्त्री रूपावर भक्तिगीते नाहीत. भारतीय संस्कृतीचे हे आगळे वैशिष्ट्य आहे की, तिने परमेश्वराला स्त्री रूपातही कल्पले आहे. इतकेच काय, तृतीयपंथीयांची स्वतंत्र चळवळ उभारणाऱ्या पाश्चिमात्य जगाच्या हजारो वर्षे आधी भारतीयांनी अर्धनारी नटेश्वराच्या रूपात परमेश्वराचे तिसरे रूपही पूजनीयच मानले होते. तशी भक्तिपंथ ही संकल्पना भारतीय आहे. इतर ठिकाणी मूर्तीपूजा नसल्याने देवाची भारतीय पद्धतीची भक्ती अभिप्रेतच नाही. देवाने मध्यस्थामार्फत दिलेल्या आज्ञांचे केवळ पालनच महत्त्वाचे मानले आहे.
भारतीय विचारवंतांनी देवाचे आदिशक्ती, आदिमाया हे रूप कल्पलेले असल्याने देवीच्या भक्तीची अनेक सूक्ते, गीते, भजने लोक आवडीने गातात, भक्तीत तल्लीन होऊन जातात. आमचे संत तर महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या विठ्ठलाला अनेकदा ‘विठाई’ म्हणून प्रेमाने हाक मारतात. देवाला आई मानल्यामुळे माणसाची वात्सल्याची भावनिक भूक भागते. सर्व जगाच्या भल्याची प्रार्थना करणाऱ्या ज्ञानदेवांचा उल्लेखही आपण ‘ज्ञानेश्वर माऊली’ असा करतो. असेच देवीचे एक सुंदर भक्तिगीत असलेला जितेंद्र, रिना रॉय आणि रामेश्वरीचा ‘आशा’ नावाचा सिनेमा आला होता १९८० साली! त्यात आनंद बक्षीजींनी लिहिलेल्या या भजनाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत होते. ते गाताना, ऐकताना आजही अनेकांच्या डोळ्यांत पाणी येते. अर्थात त्यासाठी ईश्वरावर दृढ विश्वास हवा, एखाद्या मोठ्या संकटाचा अनुभव येऊन गेलेला हवा. कारण संत म्हणतात, ‘देवा, माझ्याकडे संकटे पाठव. म्हणजे मला तुझी आठवण राहील.’
सगळे ठीक चालले असताना माणसाचा अहंकार बळावतो. त्याला वाटते माझे आयुष्य मीच घडवतो आहे. मात्र विपत्तीच्या काळात त्याला आपल्या मर्यादा कळतात. मग हे जगड्व्याळ विश्व निर्माण करणाऱ्या आणि युगानुयुगे सूत्रबद्धपणे चालवणाऱ्या निर्मिकाची आठवण येते.
त्याच भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला संगीत होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे! महंमद रफी आणि नरेंद्र चंचल यांनी गायलेल्या या गीताचे शब्द होते –
तुने मुझे बुलाया शेरावालीये,
मै आया, मै आया शेरावालीये…
ओ पहाडावालीये, ओ ज्योतावालीये,
मेहरावालीये…
मानवी जीवन हा एक प्रदीर्घ प्रवास आहे. त्याचा यशस्वी शेवट ईश्वरभेटीत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रवासात डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी, प्रवास कितीही लांबला तरी, थांबून चालणार नाही असे आनंदजी सुचवतात –
सारा जग हैं एक बंजारा,
सबकी मंझिले तेरा द्वारा.
उंचे पर्वत लंबा रस्ता,
पर मै रहना पाया, शेरावालीये…
अनेकदा भक्त ईश्वराची कल्पना करताना तो त्याला जसा हवा आहे, तशीच करत असतो. देव सर्वांना समान वागणूक देतो. तो सर्वांच्या बाबतीत दयावान असतो. गरीब, श्रीमंत असा मानवी जगातील भेदाभेद न करता तो सर्व भक्तांना प्रेमाने जवळ करतो, अशी मांडणी नेहमी केली जाते. तीच बक्षीजींनी पण केली आहे.
कौन हैं राजा, कौन भिकारी,
एक बराबर तेरे सारे पुजारी.
तुने सबको दर्शन देके,
अपने गले लगाया, शेरावालीये…
जेव्हा माणूस भक्तिरसात न्हाऊन निघतो, तेव्हा त्याच्या मनाचे आकाश उजळते. आतल्या गाभाऱ्यात ज्ञानाचा एक वेगळाच प्रकाश तेवू लागतो. अवघ्या जीवमात्राशी नाते जुळते. नवे जीवलग मिळतात. मनात सतत आनंदाच्या लहरी उठत राहतात. देवाकडे काही मागण्याची इच्छाच उरत नाही –
सुने मनमे जल गयी बाती,
तेरे पथपे मिल गये साथी,
मुंह खोलू क्या तुझसे मांगू,
बिनमांगे सब पाया, शेरावालीये…
हिंदी चित्रपटसृष्टीतील तत्कालीन गंगा-जमनी तहजीबमध्ये चित्र खूप सुंदर होते. असेच दुसरे एक भक्तिगीत लिहिले होते मजरूह सुलतानपुरी यांनी. सिनेमा देवी शर्मा यांचा १९६४ला आलेला ‘गंगाकी लहरे.’ संगीत चित्रगुप्त यांचे आणि गायिका लतादीदी. मजरूहजींनी जणू देवीचे स्तोत्रच लिहिले होते. आदिमायेची स्तुती करताना ते म्हणतात ‘जो कुणी तुझ्या दारावर आला त्याचे कल्याण झालेच म्हणून समजा. त्याला काही मागायची गरजच पडत नाही. सगळे आपोआप त्याच्या झोळीत पडते –
जय जय हे जगदम्बे माता,
द्वार तिहारे जो भी आता,
बिनमांगे सब कुछ पा जाता…
जय जय हे जगदम्बे…
जगदंबा ही जगतजननी आहे. त्यामुळे ती हवे, तर जीवन देऊ शकते आणि हवे तेव्हा ते परतही घेऊ शकते. माणसाच्या जीवनाचा क्षण न क्षण तिच्याच हातात असतो –
तू चाहे तो जीवन देदे,
चाहे पलमें जीवन लेले.
जनम-मरन सब हाथमें तेरे
हे शक्ती, हे माता…
जय जय हे…
इथेही पुन्हा ईश्वराचे प्रेमस्वरूप वर्णनच दिसते. देवाची पूजा करणारा पुजारी असो की राजा असो किंवा आपल्या पूर्वकर्माने सर्व गमावलेला भिकारी असो, आई जगदंबा त्या सर्वांना आपली मुलेच समजून त्यांच्यावर प्रेम करते त्यांच्याबाबत वत्सल असते.
पापी हो या, होय पुजारी,
राजा हो या, होय भिखारी…
फिर भी तूने जोड़ा सबसे,
माँ-बेटेका नाता,
जय जय हे जगदम्बे माता…
माणूस वेदनेत, संकटात असतो तेव्हा स्वाभाविकपणेच त्याला आपल्या निर्मात्याची, देवाची आठवण येते. त्याचे अंतर्मन नकळत देवाचा धावा करू लागते. त्याला ‘वरून’ काही मदत मिळावी, असे तीव्रपणे वाटू लागते. मजरूहजी म्हणतात, आई जगदंबा तिच्या लेकरांची हाक लगेच ऐकते. ती स्वत: पुढे येऊन त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करते –
जब जब जिसने तुझको पुकारा,
तूने दिया हैं बढ़के सहारा.
हर भूले राहीको, तेरा प्यारही
राह दिखाता…
जयजय हे जगदम्बे माता…
आज विज्ञानाच्या आणि विशेषत: तंत्रज्ञानामुळे माणसाला शक्य झालेल्या तांत्रिकी चमत्कारांनी प्रभावित होऊन निरीश्वरवादाने माणसाच्या मनाचा ताबा घेतला आहे. हळूहळू एकंदरच सर्व श्रद्धा आणि उच्च नैतिक मूल्ये नष्ट करण्याचा चंगच मनोरंजन विश्वातील काही लोकांनी बांधला आहे. त्यावेळी अशी साधीसरळ शब्दांत माणसाची श्रद्धा जागवणारी, त्याला दिलासा देणारी, जगात काहीतरी आशा करण्यासारखे आहे, अशी भावना टिकवून ठेवणारी गीते पुन्हा पुन्हा ऐकायलाच हवीत ना?
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…