- ऐकलंत का!: दीपक परब
अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या ‘ढ लेकाचा’, ‘अदृश्य’, ‘बोल हरी बोल’ या आणि इतर सुपरहिट चित्रपटांनंतर आता ‘हिरा फेरी’ हा नवा कोरा भन्नाट विनोदी चित्रपट १४ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणाऱ्या ‘हिरा फेरी’ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा पार पडला असून यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि अल्ट्रा मीडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल, अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्केटिंग हेड ब्रिंदा अग्रवाल, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे बिजनेस हेड वेंकट गारापाटी, चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल बिडकर आणि कलाकार अभिनय सावंत, प्रवीण प्रभाकर तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक काशी रिचार्ड आणि गायक अरुण देव यादव, मनाली चतुर्वेदी, लव पोद्दार हे उपस्थित होते.
‘हिरा फेरी’ चित्रपटाचा ट्रेलर एकदम दिमाखदार असून चित्रपटात रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आळशी घरजावई विक्कीने, म्हणजेच निर्मिती सावंत यांचे सुपुत्र अभिनय सावंतने, आपली बायको अनूसोबत एका चोराला आपल्या जाळ्यात अडकवून, त्याचा बहुमोल हिरा हडपण्याच्या प्रयत्नांत असताना, तिथे बायकोचा बाप, चोराचा बॉस, मांत्रिक, पत्रकार आणि पोलिसांचा मिलाप होऊन त्या हिऱ्यासाठी घोडदौड सुरू होते आणि या ‘हिरा फेरी’त हिरा कोणाकडे फिरेल हा प्रश्न उभा राहतो. नेमका हिरा कोणाकडे जाईल याची मजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल ‘हिरा फेरी’ चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले, प्रेक्षकांच्या वाढत्या दर्जेदार मनोरंजनाच्या मागणीचा मागोवा घेत आम्ही ‘अल्ट्रा झकास’ हा एकमेव दर्जेदार आणि अखंड मनोरंजन देणारे ओटीटी माध्यम लाँच केले आणि त्या अानुषंगाने प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करत बक्कळ मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी आम्ही ‘हिरा फेरी’ हा लोटपोट हसवणारा विनोदी चित्रपट सादर करीत आहोत. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.