प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
सुट्टीच्या दिवशी दुपारी आईच्या म्युनिसिपल शाळेतील काही विद्यार्थी घरी ट्युशनसाठी यायचे. त्यांना विनामोबदला ती स्कॉलरशिप परीक्षेचे धडे द्यायची. ट्युशन संपली की, आई या मुलांना पोटभर जेवू-खाऊ घालायची. त्यांची सुख-दुःखे समजून, त्यांच्या समस्या सोडवण्याचा तिच्या परीने प्रयत्न करायची.
माझी आई खूप दानशूर नाही; परंतु आमच्या शाळेचे जुने युनिफॉर्मसुद्धा ती व्यवस्थित धुवून, घडी घालून तिच्या म्युनिसिपल शाळेच्या विद्यार्थ्यांना नेऊन द्यायची. आता आमच्या शाळेचा युनिफॉर्म आणि म्युनिसिपल शाळेचा युनिफॉर्म वेगळा होता. त्यामुळे आम्ही हसायचो. म्हणजे आमचे फ्रॉक किंवा इतर कपडे जर आई गरीब मुलांसाठी घेऊन गेली, तर आम्हाला काहीच वाटले नसते पण युनिफॉर्मसुद्धा? त्यावर आई म्हणायची की, हे सगळे विद्यार्थी शाळेच्या आसपासच राहतात. शाळा सुटते बारा वाजून वीस मिनिटांनी आणि आम्ही शिक्षक एक वाजता तिथून निघतो, तेव्हा रस्त्यात बसस्टॉपपर्यंत जाताना काही विद्यार्थी रस्त्यावर उघडे किंवा सकाळी शाळेत घालून आलेल्या युनिफॉर्मवरच खेळताना दिसायचे. त्यांच्याकडे एक जोड कपडा घेण्याचेही पैसे नाहीत, हे जाणवायचे. तुमचे युनिफॉर्म मी जेव्हा त्यांना देते, तेव्हा तुमचा युनिफॉर्म त्यांच्या अंगावर मला खेळतानाही घाललेला दिसतो. फाटके कपडे घालून किंवा उघडे खेळण्यापेक्षा त्यांना किंवा मलाही ते तुमच्या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात, याचा आनंद आहे.
त्यावेळेस आम्ही बाबांना मिळालेल्या सरकारी बंगल्यात राहायचो. साधारण पंधरा दिवसांतून एकदा दुपारच्या वेळेस एक माणूस डोक्यावर खूप सारी भांडी घेऊन यायचा. त्या माणसाभोवती आमच्या सोसायटीतल्या बायकांबरोबर आम्ही मुलेही जमायचो. शेजारपाजारच्या बंगल्यातील बायका जुने कपडे देऊन भांडी घ्यायच्या. तेव्हा कितीतरी चकचकीत भांडी आम्हालाही आवडायची. आम्ही आईपुढे ती भांडी घेण्यासाठी हट्ट करायचो. आई कधीच त्या भांडी विक्रेत्या माणसासमोर आल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे एकही भांडे आम्ही कपड्यांवर घेतले नाही. बाबांचे जुने कपडे ती त्यांच्या शाळेतल्या शिपायांसाठी किंवा आमच्याकडे रोज सकाळी दूध आणून देणाऱ्या काकांना द्यायची. तिच्या साड्या ती गावातल्या आमच्या नातेवाइकांना किंवा दारात कपडे मागायला येणाऱ्या गरीब बाईला द्यायची. साड्यांची गोधडी केलेली किंवा अंगावर घेतल्याचेही मला तरी आठवत नाही.
आमच्या लहानपणी कितीतरी विक्रेते दारी यायचे त्यापैकी एक म्हणजे घरातले तुटके-फुटके प्लास्टिक दिल्यावर त्या बदल्यात लसूण विकणारे. त्यामुळे जुन्या-तुटक्या बादल्या वा तत्सम प्लास्टिकच्या वस्तू याबरोबर दुधाच्या पिशव्यासुद्धा बायका स्वच्छ धुऊन वाळवून त्यावर लसूण विकत घ्यायच्या. ते मात्र आई घेत असे. कोणतीही प्लास्टिकची वस्तू तुटली, तर व्यवस्थित एका पिशवीमध्ये घालून ती ठेवायची आणि हा विक्रेता आल्यावर त्याला ते सर्व द्यायची. जुन्या तुटक्या वस्तूंचेही तिला मोल होते.
आमच्या घरात जितका ओला कचरा निघायचा, तो सगळा रोजच्या रोज आम्ही आमच्या बंगल्याच्या आवारातील एका खड्ड्यात टाकून त्यावर पालापाचोळा टाकून ठेवायचो. असे कितीतरी खड्डे आम्ही आमच्या कंपाऊंडमध्ये केले होते. मग खत तयार झाल्यावर ते झाडांना घालायचो. हे आईने शिकवलेले काम आम्ही बहिणी व्यवस्थित करायचो. इतर बंगल्यातील कोणत्याही झाडांबरोबर आम्ही तुलना केली, तर आमच्या बंगल्यातील झाडांना जास्त फुले, मोठी फळे लागायची हे आजही आठवतंय.
फावल्या वेळेत आई घरातल्या फाटलेल्या, उसवलेल्या कपड्यांना व्यवस्थित शिवून ठेवायची. कपड्यांची बटणे निघाली असतील, तर ती परत व्यवस्थित लावून ठेवायची. इतके करूनही तिला वेळ कसा मिळायचा, कळत नाही; परंतु तिच्या म्युनिसिपल शाळेतील काही विद्यार्थी रविवार किंवा सणवार असलेल्या सुट्टीच्या दिवशी दुपारी आमच्या घरी ट्युशनसाठी यायचे. त्यांना विनामोबदला ती स्कॉलरशिप परीक्षेचे धडे द्यायची. या मुलांसोबत आम्हीही तिच्यासमोर बसायचो, तेव्हा आमच्या ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडायची. ट्युशन संपली की, आई या मुलांना पोटभर जेवू-खाऊ घालायची. त्यांची सुख-दुःखे समजून घ्यायची. त्यांच्या समस्या सोडवण्याचा तिच्या परीने प्रयत्न करायची. हे सर्व शिकत शिकत आम्ही मोठे झालो.
आज कुणी माझ्या दारात जर डोनेशन मागायला आले, तर मी पटकन मला जमेल तितके मदत करायला मागे-पुढे धजत नाही; परंतु ‘पैसे देणे’ खूपच छोटी गोष्ट आहे असे वाटते, जेव्हा ज्या प्रकारे माझी आई स्वतःचे ज्ञान, स्वतःच्या हाताने केलेले पदार्थ आणि स्वतःचा वेळ देत होती! तसे पुण्य पदरात घालून घेणे, मला जमले नाही याची खंत आहे.
हे मी केवळ माझ्या आईविषयी लिहिले असेल; परंतु आपणा सर्वांना यानिमित्ताने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, अभावग्रस्ततेत आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेला त्याग, अप्रत्यक्षपणे आपल्यावर केलेले संस्कार जरी आठवले तरीसुद्धा पुरेसे आहेत, असे मला वाटते!
[email protected]