अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पोलादपूर : रायगड (Raigad) जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट (Aambenali ghat) रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुढील १५ दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर हा आंबेनळी घाटरस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग यांच्या पत्रानुसार आंबेनळी घाट रस्ता हा अरूंद व घाट वळणाचा आहे. रस्त्याच्या बाजूला असणारा डोंगरकडा हा या भागात पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर येऊ शकतात. तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
कोकण व महाबळेश्वरला जोडणारा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा आंबेनळी घाट आहे. पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा आहे, असे अभिप्राय सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी महाड डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पोलादपूर महाबळेश्वर या आंबेनळी घाटरस्त्यावरील कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी या अधिसूचना दिनांक २८ जुलैपासून ते पुढील १५ दिवसांकरिता लागू राहतील.