नवी दिल्ली: भारतातून पाकिस्तानात येऊन निकाह करणाऱ्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्याबद्दल पाकिस्तातील बिझनेसमॅननं मोठी भेट दिली आहे. अंजूने तिचा फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह केला व तिचे नाव फातिमा केले. अंजूची फातिमा झाल्यामुळे एका उद्योगपतीने तिला चक्क कोट्यवधीची जमीन, एक चेक भेट म्हणून दिला आहे.
पाक स्टार ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ मोहसिन खान अब्बासी यांनी अंजूला फातिमा झाल्याबद्दल आनंदी होऊन घर बांधायला जमीन, ५० हजार पाकिस्तानी रुपयांचा चेक भेट दिला आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी अब्बासी यांची मुलाखत घेतली. त्यात अब्बासी म्हणतात की, अंजू भारतातून पाकिस्तानात आली आहे. तिने इस्लाम धर्म स्वीकारून आता ती फातिमा बनली आहे. याचा मला खूप आनंद झाला. त्यामुळे तिला माझ्याकडून भेट दिली आहे. फातिमाच्या निर्णयाचं स्वागत करण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितले. तसेच जेव्हा कधी कुणी त्यांचे ठिकाण बदलून दुसरीकडे जाते तेव्हा सर्वात मोठी अडचण घराची असते. सध्या आमचा एक प्रोजेक्ट सुरू आहे त्यात आम्ही फातिमाला जमीन देत आहोत. या प्रस्तावाला स्थानिक शासकीय कार्यालयातूनही मंजुरी मिळाली आहे. ही भेट खूप छोटी आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी हे कार्य आम्ही केलं. आता ती निश्चिंतपणे पाकिस्तानात स्वत:च्या घरात राहू शकते असंही मोहसिन अब्बासी यांनी म्हटलं.
प्रकरण नेमके काय?
मागील २१ जुलैला राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी इथं राहणाऱ्या अंजूने तिच्या २ मुलांना सोडून पती अरविंदला जयपूरला जाते सांगून थेट पाकिस्तान गाठले. अंजू आधी दिल्ली आणि तिथून अमृतसर मार्गे वाघा बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात पोहचली. या प्रवासावेळी अंजू तिचा पती अरविंदसोबत व्हॉट्सअपवर संपर्कात होती. पाकिस्तानात पोहचल्यानंतर तिने घरच्यांना काही दिवसांत परत येऊ असं म्हटलं. मात्र काही दिवसांनी अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून तिचा फ्रेंड नसरुल्लाहसोबत निकाह केला. तत्पूर्वी या दोघांच्या लग्नाचे प्री वेडिंग फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते.