
नापास झालेल्या विद्यार्थ्यांची घेतली मुलाखत आणि.... जाणून घ्या काय निष्कर्ष निघाले...
मुंबई : 'संशोधन' ही प्रक्रिया फक्त प्रयोगशाळांपुरता मर्यादित नाही व संशोधन करण्यासाठी शिक्षणाची, वयाची व सामाजिक स्थितीची अट नाही हे डी. जी. रुपारेल महाविद्यालयातील SYBA आणि MSc च्या विद्यार्थ्यांनी “पुकार” या संस्थेच्या Community Based Participatory Action Research (CBPAR) या डिप्लोमा संशोधन कोर्स मार्फत सिद्ध केलं आहे. या विद्यार्थ्यांनी '80 किंवा KT – महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ सत्र-३ चा ATKT निकाल' या विषयावर अनोखे संशोधन केले आहे.
महाविद्यालयाच्या सत्र-३ (द्वितीय वर्ष)-च्या कला , विज्ञान व वाणिज्य शाखांचा निकाल फार कमी लागला. इतक्या जास्त प्रमाणात मुलं नापास का झाली? व झाल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला? त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? समाजाचा मुख्यत: प्राध्यापक , पालक व मित्रपरिवाराचा नापास होणे ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घेणे हे या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट होते.
संशोधन प्रक्रियेमध्ये माहिती जमवण्यासाठी मुलाखत पद्धतीचा वापर केला गेला व सत्र-३च्या कला , विज्ञान व वाणिज्य शाखेतील नापास झालेल्या २६ विद्यार्थ्यांची व ६ प्राध्यापकांची मुलाखत घेण्यात आली.

या सर्व संशोधन प्रक्रियेतून संशोधकांना मिळालेले निष्कर्ष म्हणजे-
विद्यार्थ्यांनी करोना महामारीच्या काळात अभ्यासाला फार हलक्यात घेतले त्यामुळे त्यांची लेखन, पाठांतर, वाचन व तसेच विचार करण्याची सवय या काळात मोडली. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यापैकी काही समस्या म्हणजे -
१)उत्तर आठवत होतं पण लिहताना वेग जुळवता आला नाही व पेपर अर्धवट राहिला.
२)उत्तर साचेबद्ध स्थितीत न लिहिता विस्कळीतपणात, जसं आणि जितकं आठवतंय तसं लिहिलं गेलं. त्यामुळे त्यात मुद्देसुदपणा नव्हता.
३)कोविड काळात झालेल्या ऑनलाईन वर्गातील अभ्यासक्रम समजला नसल्यामुळे मूळ संकल्पनाच मुलांना माहित नव्हत्या व अचानक दोन वर्षांनंतरचा थोडा कठीण अभ्यास त्यांना थेट करावा लागला.
४)विद्यार्थ्यांनी करोना काळात उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:हून नोकरी करणे स्वीकारले होते. परंतु कॉलेज व नोकरी/कामाच्या वेळा त्यांना जुळवता आल्या नाहीत व अभ्यास मागे राहिला.
५) कोविडमध्ये घरीच बसून असल्यामुळे इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडिया या सर्वांचा वापर वाढला. व त्याचे व्यसन लागले. परंतु या व्यसनाचा वापर विद्यार्थ्यांकडून अभ्यास करण्यासाठी म्हणावा तितका झाला नाही.
या संशोधनाचा प्रसार व्हावा व विद्यार्थ्यांना या विषयाबद्दल जागृत करता यावे तसेच विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून या विषयावर प्रतिक्रिया मिळवता याव्यात या उद्देशाने २१ जुलै या तारखेला सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत रुपारेल महाविद्यालयात 80 or KT या विषयांतर्गत संशोधन करणार्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमही सादर केला. ज्यात या विषयावर नाटक सादर केले गेले व प्रकल्पाविषयीच्या इत्थंभूत गोष्टीही सांगितल्या गेल्या.