
- विशेष : उमेश कुलकर्णी
प्रख्यात लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने एका उमद्या लेखनाचा बाज हरवला आहे. क्रिकेट आणि चित्रपट या दोन क्षेत्रांमध्ये सगळ्यांना सगळं कळतं, असे त्यांनी आपल्या फटकेबाजीत लिहून ठेवलं आहे. त्यानुसार कणेकर यांच्यानंतर अनेकांनी याच दोन विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडे कणेकरी लेखनाचा बाज नव्हता. कणेकरांनी आपल्या लेखनाने हजारो साहित्यप्रेमींना धरून ठेवले होते. त्यांनी लेखनात विनोद आणला, पण तो निर्विष होता. त्यात कुणाविरोधात वार केले नाहीत. तसा विनोद त्यांना अभिप्रेतच नव्हता. अर्थात त्यांचीही काही श्रद्धास्थाने होती. दिलीपकुमार आणि लता मंगेशकर ही त्यांची श्रद्धास्थाने होती. त्यांच्याविरोधात त्यांनी कधी लेखन केले नाहीच. पण त्यांचे चुकते आहे असे दिसले, तेव्हा त्यांनाही सोडले नाही. अत्यंत प्रामाणिक असे ते आपल्या लेखनाशी होते.
अनेक व्यक्तिमत्त्वांवर त्यांनी लिहिले. ज्यात राजेश खन्ना, राज कपूर, अमिताभ बच्चन आणि कित्येक नायक-नायिकांचा समावेश होता. राजेश खन्ना यांची लोकप्रियता जेव्हा परमोच्च बिंदूवर होती, तेव्हा त्यांनी राजेशसंदर्भात लिहिलेल्या एका लेखावर गदारोळ उठला होता. कित्येक राजेशचे चाहते त्यांचे दुष्मन झाले होते. अर्थात हा सिनेमा वेडाच्या सुवर्णयुगाचा कालावधी होता ती व्यक्तिमत्त्वे महान होती आणि लोकही त्यांचे पूजा करणारे होते. जसजशी ती व्यक्तिमत्त्वे अस्तंगत झाली तसे कणेकरांनी आपले लेखन थांबवले.
क्रिकेटमध्ये ब्रॅडमन सर्वश्रेष्ठ फलंदाज का? यावर अनेकांनी रकाने भरभरून लिहिले आहे. त्यावर कणेकरांची माहिती अजब आहे. आपल्याच ‘फटकेबाजी’ या पुस्तकात त्यांनी ब्रॅडमन यांच्यावर दिग्गजांची मते नोंदली आहेत. त्यातून ब्रॅडमन यांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघते. ब्रॅडमन यांच्यावर लाखो पुस्तके लिहिली गेली असतील, पण कणेकरांनी आपल्या लेखनातून ब्रॅडमन यांचे व्यक्तिमत्त्व जे फुलवले आहे आणि त्यात कुठेही बोअर न करता. त्याबद्दल रसिक त्यांना धन्यवाद देतील.
रांगणेकरांच्या पत्नीचा कणेकरांनी दिलेला किस्सा तर अफलातून आहे. कणेकर यांच्यावर संकटे आलीच. एक खटला त्यांच्या अतिउत्साही स्वभावातून बातमी दिल्यामुळे ओढवला. ही बातमी खोटी होती. पती-पत्नी चित्रपट पाहण्यासाठी गेले असताना गुंडांनी पत्नीला पळवून नेले आणि बलात्कार करून परत पाठवले. नंतर पत्नी घरी आंघोळीला आली आणि तिनं गळफास लावून घेतला. या याच घटनेवरून नंतर ‘घर’ हा चित्रपट तयार झाला. पण ही बातमी दिल्याबद्दल कणेकर यांना अनेक वर्षे कोर्टात खटला लढवावा लागला. सुदैवाने ते वकीलच होते म्हणून ते या खटल्यातून तावून सुलाखून बाहेर पडले. पण व्हायचा तो मनस्ताप झालाच. मुळातच ती घटना घडल्याचा कोणताच पुरावा नव्हता. पण कणेकरांनी कसलीही कटुता मनात ठेवली नाही. अत्यंत उमदे, रसिक आणि खेळकर असे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला ते खेळकरपणे सामोरे जात.
‘यादोंकी बारात’पासून त्यांनी आपल्या मुशाफरीला सुरुवात केली आणि सतत ७५ वर्षे त्यांची लेखणी अव्याहत सुरू होती. स्वतःवर विनोद करणारे आणि त्याचा मनसोक्त आनंद घेणारे फारच विरळ असतात. त्यात कणेकर हे एक होते. कणेकरांनी ललित लेखन प्रचंड केले आहे आणि त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. एकेका पुस्तकावर हयात काढणारे लेखक आहेत. कणेकरांनी प्रत्येक पुस्तक प्रचंड लोकप्रिय केले आणि त्यांच्या सर्व पुस्तकांच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या संपल्या. पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांच्याइतकीच लोकप्रियता त्यांना मिळाली. यात अतिशयोक्ती नाही.
कोणतेही क्षेत्र त्यांना परके नव्हते. स्वतःच्या नावाने लेखनशैली ओळखली जावी हे भाग्य त्यांना लाभले. थोड्यांनाच लाभते, ते कणेकरांनी प्राप्त केले. कणेकरांनी ते स्वतःच्या कसदार विनोदाच्या जीवावर प्राप्त केले. त्यांच्या अनेक नकलाही आल्या. पण त्यात कसलाच अर्थ नव्हता. वाचकांनी असे हिणकस लेखन लगेचच झिडकारून टाकले. केवळ अस्सल तेच चालते. त्याप्रमाणे शिरीष कणेकरांचे लेखनच चालले. उरलेला कचरा बाजारात फेकला गेला. कणेककरांची लेखणी अष्टपैलू होती. कोणतेही क्षेत्र तिला परके नव्हते. अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांच्या सान्निध्यात ते राहिले. पण त्याचा कसलाही गर्व त्यांना नव्हता. काही जण निव्वळ आपण एखाद्या अभिनेत्रीच्या किवा अभिनेत्याच्या जवळचे आहोत यावरच आयुष्य काढतात. कणेकरांनी तर लता दीदी, अमिताभ, राजेश खन्ना, दिलीपकुमार यांसह अनेकांच्या सान्निध्यात जीवन जगले. पण त्यांचा त्यांनी कधीही फायदा घेतला नाही आणि फुकट डिंगा मारल्या नाहीत.
कणेकरांच्या जाण्याने खरेतर त्यांच्यासारखे लेखन करणारे आता कुणीच नाहीय. तो काळही आता नाही. आता चित्रपटाचा पहिल्या शोला बनियनवर तिकिटासाठी रांगा लावणारे कुणी नसतील. काळाबाजार हा तर आता बंदच झाला आहे. इतकेच काय पण अभिनेते आणि अभिनेत्रींवर जीव टाकणारे कुणी नसतील. आजकालच्या जगात कणेकर नाहीतच, तेच बरे आहे. कारण त्यांच्या काळातील सिनेमा आज नाही आणि ते क्रिकेटही नाही. चित्रपट तर सगळे पहातात. पण प्रत्येक चित्रपटाचा आस्वाद घेणारे ते होते. कंटाळवाणा चित्रपट म्हणजे महान असे एक घातक समीकरण रूढ होऊ पहात होते. त्याला कणेकरांनी ठाम विरोध केला. जो मनोरंजन करतो तो चांगला चित्रपट असे त्यांचे समीकरण होते. कणेकरांच्या काळातील नितीनियम बदलले, नितीमत्तेचे निकषही बदलले आणि नवीन नियमांत कणेकर बसत नव्हते. त्यामुळे त्यांना आजचा चित्रपट मुळीच रूचला नसता. जे सिनेमाचाचे तेच क्रिकेटचे. वन डे क्रिकेटला त्यांचा विरोध नव्हता. पण टी-२० सामने मात्र त्यांना आवडत नसत. त्यांची मते परखड होती. टी-२० ला ते खरे क्रिकेट समजतच नसत. त्यामुळे टी-२०च्या वाटेलाच ते जात नसत. एक हरहुन्नरी आणि बहुआयामी प्रतिभेचा मास्टर कणेकर यांचे जाणे चटका लावून जाणारे आहे.