
कोण आहेत गौरी सावंत?
मुंबई : भारतीय चित्रपटांमधून तृतीयपंथी (Transgenders) समाजाचे बर्याचदा विनोदी ढंगाने प्रदर्शन केले जाते, अशा टीका होतात. मुळात तृतीयपंथी समाजाचे दर्शन घडवणारे चित्रपट किंवा कलाकृती आपल्याकडे मोजक्या आहेत. मात्र, आता ओटीटीच्या (OTT paltforms) येण्याने अनेक न हाताळलेले व गंभीर विषय लोकांसमोर मांडले जात आहेत. त्यातच सध्या समाजसेविका म्हणून काम करणार्या तृतीयपंथी श्रीगौरी सावंत (Shree Gauri Sawant) यांच्यावरील चरित्रपटाची (Biopic) गेले अनेक दिवस चर्चा होती. या वेब सीरिजचा (Web Series) टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावरील कमेंट्स पाहता सर्व चाहत्यांमध्ये वेब सीरिज विषयी उत्सुकता दिसून येत आहे.
'ताली... बजाऊँगी नहीं बजवाऊँगी' (Taali... Bajaungi nahi bajvaungi) या वेब सीरिजमध्ये मिस युनीव्हर्स (Miss Universe) आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Bollywood actress Sushmita Sen) तृतीयपंथी गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. रवी जाधवने (Ravi Jadhav) या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजचा टीझर पाहता सुष्मिताचा मेकअप अत्यंत उत्तम झाल्याचे दिसून येत आहे. 'गाली से ताली तक' अशी गौरी सावंतच्या आयुष्याची कहाणी सांगणारी ही वेब सीरिज १५ ऑगस्टपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.
'ताली' वेब सीरिजचे मोशन पोस्टर शेअर करत ३० जून २०२२ला याबद्दल घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ६ ऑक्टोबरला सुष्मिताचा गौरीच्या लूकमधील पहिला फोटो शेअर करण्यात आला. यानंतरच या वेब सीरिजची चर्चा सुरु झाली होती. आता याचा टीझर आला असून यातले संवाद फारच परिणामकारक आहेत. त्यामुळे वेब सीरिजद्वारे नेमका कसा प्रवास दाखवला आहे, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
कोण आहेत गौरी सावंत?
गौरी सावंत यांचा जन्म मुंबईतील दादर येथील एका मराठी कुटुंबात झाला. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव गणेश नंदन ठेवले. गौरी सावंत सात वर्षांच्या असताना त्यांच्या आईचं निधन झाले. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजीने केले. गौरी सावंत यांचे वडील पोलीस अधिकारी होते. गौरी सावंतला तिच्या लैंगिकतेची जाणीव होती, पण इच्छा असूनही ती तिच्या वडिलांना सांगण्याचे धाडस करू शकत नव्हती. अखेर त्या घरातून निघून गेल्या. तेव्हा गौरी यांचं वय १४ किंवा १५ वर्षांचं होतं. गौरी सावंत म्हणजेच गणेश नंदन यांनी नंतर वेजिनोप्लास्टी केली आणि त्या कायमच्या गौरी सावंत झाल्या.
गौरी या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या अनेक वर्षांपासून ट्रान्सजेंडर्ससाठी काम करत आहेत. गौरी सावंत 'कौन बनेगा करोडपती'च्या एका एपिसोडमध्येही दिसल्या होत्या. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही त्यांचे कौतुक केले होते. गौरी सावंत यांनी आयुष्यात खूप दुःख सोसले आणि खूप संघर्ष केला. २००० मध्ये गौरी सावंत यांनी आणखी दोघांच्या मदतीने 'सखी चार चौघी ट्रस्ट'ची स्थापना केली. तेव्हापासून गौरी सावंत सर्व ट्रान्सजेंडर्सच्या हितासाठी काम करत आहेत. या एनजीओच्या माध्यमातून गौरी घरातून पळून जाणाऱ्या ट्रान्सजेंडर लोकांना मदत करतात.