डोळ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. या रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्व सरकारी आणि खासगी दवाखान्यांना सतर्क केले असून ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईमध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र सध्या मुंबईत पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते. ही साथ ‘अत्यंत सांसर्गिक’ आहे आणि तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.
डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होतो. याच्या लक्षणांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे, यांचा समावेश होतो. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्व आरोग्य संस्थांमध्ये कन्जक्टीव्हायटीस आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध आहेत, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.
डोळ्याची साथ पसरू नये म्हणून नागरिकांनी ज्या विभागात पावसामुळे माश्या किंवा चिलटाचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा.
ज्या व्यक्तींमध्ये कन्जक्टीव्हायटीस आजाराची लक्षणे आढळतात, त्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे तसेच डोळ्याला वारंवार हात लाऊ नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.
एकापासून दुस-या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
व्यक्तीचे कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवावीत जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही.
शाळा, वसतिगृह, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ असेल तर डोळे आलेल्या मुलाला/मुलीला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना कन्जक्टीव्हायटीसची लक्षणे आढळून आल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.
डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी कन्जक्टीव्हायटीस आजाराची लक्षणे आढळल्यास नजीकच्या मनपा रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra