
मुंबई : आधार कार्ड (Aadhar Card) हा व्यक्तीच्या जन्म तारखेचा पुरावा असू शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पुणे पोलिसांची (Pune Police) याचिका फेटाळून लावली.
आरोपी अल्पवयीन आहे की नाही?, याचा शोध पुणे पोलिसांना आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्म तारखेच्या आधारे घ्यायचा होता. मात्र जन्मतारीख शोधायची असेल तर जन्म दाखला किंवा अन्य कागदपत्रे तपासा, यासाठी आधार कार्डची काय गरज नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने पोलिसांना फटकारले.
मुळात आधार कार्ड हा वास्तव्याचा पुरावा आहे. त्याचा वापर जन्मतारीख तपासण्यासाठी केला जाऊ शकत नाही. आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरु नये, असे केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केलेले असतानाही पुणे पोलिसांनी ही याचिका का केली?, असे नमूद करत हायकोर्टाने पुणे पोलिसांना खडे बोल सुनावले.