
टी-२० ‘विश्वचषक २०२४’(t20 world cup) ची तारीख निश्चित, ४ जूनपासून सुरू होणार खेळाला सुरूवात; वेस्ट इंडिज, अमेरिकेकडे यजमानपद
आयसीसी टी-२० ‘विश्वचषक २०२४’ (t20 World Cup)वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेचे सामने पहिल्यांदाच अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजमध्ये दुसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. २०१० मध्ये त्यांना या टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या मते टी-२० विश्वचषक ४ जूनपासून सुरू होणार आहे. ३० जूनला हे सामने संपणार आहेत. २७ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत.
पुन्हा २४ वर्षांनी वेस्ट इंडीजला हा यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिका संयुक्तरित्या हे यजमानपद भूषवणार आहेत. आयसीसीच्या शिष्टमंडळाने या आठवड्यात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील पाच निवडक ठिकाणांना भेट दिली. यामध्ये मॉरिसविले, डल्लास, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामधील लॉडरहिल या ठिकाणी स्पर्धेतील सामने आणि सरावासाठीची मैदाने ठरवण्यात येतील.
पंधरा संघांना विश्वचषकामध्ये संधी :- आतापर्यंत १५ संघांची ठिकाणे निश्चित झाली आहेत. पाच जागा रिक्त आहेत. भारतातील आयपीएलनंतर जूनमध्ये ही स्पर्धा होणार आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील आठ संघांना पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळाला आहे. त्याचबरोबर उर्वरित दोन टॉप-१० संघांनाही आयसीसी क्रमवारीत स्थान मिळाले आहे. पापुआ न्यू गिनी, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांनी पात्रता फेरीतून टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. अशा प्रकारे १५ संघ निश्चित करण्यात आले आहेत. आता पाच जागा शिल्लक आहेत. यासाठी, अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या तीन खंडातील संघ असणे आवश्यक आहे. अमेरिकेचा एक संघ, आशिया आणि आफ्रिकेतील प्रत्येकी दोन संघांना यात स्थान मिळेल.
‘या’ संघांचे स्थान निश्चित : यजमान वेस्ट इंडिज आणि यूएसए व्यतिरिक्त, भारत, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांनी टी-२० विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले आहे.