ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती : आदिवासी, ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी उद्योगपूरक व्यवसायांची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी अशा भागात नाविण्यपूर्ण उद्योगांच्या उभारणीसाठी उद्योग समूहाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
एमआयडीसी येथील ग्रीन फॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टरच्या सोलर चरखा कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या टेक्सटाईल डिजिटल प्रिंटिंग युनिटचे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, खादी ग्राम उद्योगाचे संचालक रविंद्र साठे, एमएसएमईचे संचालक पी.एम.पार्लेकर, सहसंचालक सतिश शेळके, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, अमरावती इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, प्रदीप चेचरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांची आवश्यकता
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपला देश शेती प्रधान आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांची आवश्यकता आहे. सोलर चरखा समूह कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला प्रयत्न होत असून अशा प्रकारचे प्रकल्प ग्रामीण भागात होण्यासाठी येथील उद्योग समूहाने पुढाकार घ्यावा. देशाच्या आर्थिक विकासात उत्पादन क्षेत्राचा वाटा हा सेवा क्षेत्रापेक्षा फारच कमी आहे. उत्पादन क्षेत्राचा विस्तार केला तरच देश आत्मनिर्भर होईल. ग्रामीण, आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी खादी ग्राम उद्योग तसेच लघु व सुक्ष्म उद्योगांनी पुढाकार घ्यावा. तसेच उद्योजकांना ग्रामीण भागात उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी केले.
उत्पादित मालावर स्थानिक स्तरावरच प्रक्रिया व बाजारपेठ आवश्यक
विदर्भात संत्री, कापूस तसेच सोयाबीन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु उत्पादित मालांला बाजारपेठ व रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरच उत्पादित मालावर प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक आहे. सोलर चरखा समूह कार्यक्रम हा नाविण्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प असून अशाप्रकारचे प्रकल्प विकासात महत्वाची भूमिका निभावतील.
ऑरगॅनिक कापड निर्मिती करा, याला ग्राहकांची मोठी मागणी
भौगोलिक स्थितीनुसार उत्पादनाला चालना मिळणाऱ्या संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. संशोधनाचा वापर करुन ऑरगॅनिक कापड निर्मिती करा. याला ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्यांच्या आवडीनुसार उत्पादन निर्माण करा. ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातींचेही महत्त्व आहे. यासाठी खादी ग्राम उद्योग तसेच लघु व सुक्ष्म उद्योग विभागाने त्यांना सहकार्य करावे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सोलर चरखे वाटप
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रदीप चेचरे यांनी सामूहिक सुविधा केंद्राच्या उभारणीसंदर्भातील माहिती दिली. समूहामध्ये जिल्ह्यातील २१ गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सोलर चरखे वाटप करुन सूत कताई करण्यात आले. त्यानंतर त्यावर प्रक्रियाकरुन कापड निर्मिती करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त महिलांना रोजगार प्राप्त होत असून त्यांच्या आर्थिक जीवनमान उंचावणास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्पासंदर्भातील कॉपी बुक टेबलचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्यानंतर गडकरी यांच्या हस्ते कुटीर शॉप ॲपचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रद्धा पांडे यांनी तर आभार विजय सिरसाठ यांनी मानले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra