Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मुंबई-गोवा, वसई-पालघर-अहमदाबाद या महामार्गांसोबतच मुंबई–नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई-गोवा, वसई-पालघर-अहमदाबाद या महामार्गांसोबतच मुंबई–नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई-नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम दर्जेदार आणि वेळेत व्हावे. निकृष्ट कामासाठी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या दोन्ही रस्त्यांवरून ठाणे आणि मुंबई शहर परिसरात येणाऱ्या वाहतुकीचे नियमन करावे. अवजड आणि मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करावे, जेणेकरून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यावेळी मुंबई-गोवा, पालघर-अहमदाबाद या महामार्गांसोबतच वसई येथे पावसामुळे झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी प्राधिकरणाने तातडीने आवश्यक अशा उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. खडवली येथील टोल नाका परिसरात झालेल्या अपघाताबाबत आणि या ठिकाणच्या आवश्यक सुविधांबाबतही चर्चा झाली.

याच बैठकीत मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा-खडावली येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात यावेत. हा निधी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वाडा-भिवंडी आणि मुंबई-नाशिक महामार्ग याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, आमदार सर्वश्री सत्यजित तांबे, शांताराम मोरे, निरंजन डावखरे, विश्वनाथ भोईर, सुनील भुसारा, रईस शेख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता आदी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरु असल्याबाबत तसेच या परिसरात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाल्याची बाब नमूद केली. ते म्हणाले की, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी लक्ष द्यावे. या कामाच्या ठिकाणी संबंधित कंत्राटदार आणि जबाबदारी असलेल्या अभियंता-अधिकाऱ्यांचे नावांचे फलक लावावे. रस्त्यांचे काम दर्जेदारच झाले पाहिजे, यासाठी काटेकोर नियोजन करावे. या कामांचा वेळोवेळी दर्जा तपासला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामांना भेटीही द्याव्यात. काम निकृष्ट झाल्यास, संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

खड्डेमुक्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स यापूर्वीच स्थापन करण्यात आला आहे. या टास्क फोर्सने नियमित बैठका घेऊन खड्डेमुक्तीच्या मोहिमेला गती द्यावी. वाहतुकीच्या नियंत्रण-नियमनाकडेही लक्ष द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, अवजड वाहने व मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करा. हाईट बॅरियर लावण्यात यावीत. महामार्गांच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावीत. वाहतूक नियमनासाठी वॅार्डनसची नियुक्ती करण्यात यावी. हलकी वाहने व दुचाकींसाठी पाईप लाईन लगतच्या रस्त्याच्या कामाला गती देण्यात यावी. यापरिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

मुंबई- नाशिक महामार्गाच्या कामात विलंब होऊ नये याकडे महामार्ग प्राधिकरणाने विशेष लक्ष पुरवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. खडवली टोल नाक्याच्या परिसरातील तसेच सेवा-रस्त्यांच्या ठिकाणाच्या सुविधांकडे लक्ष द्यावे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून उपाययोजना कराव्यात. नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीत मंत्री चव्हाण आणि भुसे यांनीही मुंबई-गोवा, पालघर-अहमदाबाद तसेच खडवली येथील महामार्गांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. मुंबई- नाशिक महामार्ग आठ पदरी त्याशिवाय दोन-दोन सेवा रस्ते यामुळे तो बारा रस्त्यांचा असेल, अशी माहिती देण्यात आली. वाडा-भिवंडी रस्त्याच्या खड्डेमुक्तीसाठी तीन पथके कार्यरत असल्याचेही सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment