
नेमके प्रकरण काय?
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची जमिनीच्या व्यवहारात तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक (Fraud of Rs. 7 crore 66 lakh) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरनाईक यांच्या तक्रारीवरुन मालाडमधील मार्टिन ॲलेक्स बर्नार्ड, कोरिया (Martin Alex Barnanrd, Koria) या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, २०२१ पासून ही फसवणूक सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घोडबंदर (Ghodbandar) येथील जमिनीच्या व्यवहारासाठी २०२१ पासून प्रताप सरनाईक प्रयत्न करत आहेत. मात्र संबंधित आरोपीने टाळाटाळ केली. यानंतर सरनाईक यांनी अखेर त्यांच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडेही संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे.
नेमके प्रकरण काय?
प्रताप सरनाईक यांना घोडबंदर रोडवरील एक जमीन घ्यायची होती. जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीला म्हणजेच मार्टिन ॲलेक्स बर्नार्ड याला संपर्क केला होता. जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सरनाईक यांच्याकडून मार्टिनने पैसे घेतले होते, मात्र त्यानंतर फसवणूक केली. प्रताप सरनाईक यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रूपये दिले. मात्र मार्टिनने जमीन नावावर केली नाहीच, शिवाय त्याने जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा सरनाईक यांनी आरोप केला आहे. मार्टिनने बँकेचे हप्तेही भरले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काशीमीरा पोलिसांनी मार्टिनविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे व तपास सुरु आहे.