मुंबई (वार्ताहर) : ज्येष्ठ पत्रकार, विख्यात लेखक, लोकप्रिय एकपात्री कलाकार आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य शिरीष कणेकर शुक्रवारी पंचत्वात विलीन झाले. शिरीष कणेकर यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, अभिनेते महेश कोठारे, चित्रपट नाट्य कलाकार संजय मोने, अतुल परचुरे, विनय येडेकर, राजन भिसे, त्यागराज खाडिलकर, चित्रपट संग्राहक डॉ. प्रकाश जोशी, सिने पत्रकार दिलीप ठाकूर, पत्रकार अश्विन बापट इत्यादी मान्यवरांनी शिरीष कणेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शिरीष कणेकर यांचे चिरंजीव डॉ. अमर व कन्या अमेरिकेहून आल्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे याप्रसंगी म्हणाले की, एखाद्यावर कठोर टीका करताना निष्ठूर वाटणारे शिरीष कणेकर प्रत्यक्षात मनाने अत्यंत हळवे होते. दि. २१ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात महनीय प्रवक्ते म्हणून त्यांनी समारंभात चांगलीच रंगत आणली. ते स्वत:देखील खूप खूष झाले. त्यावेळी असे वाटले की, या आनंदाने कणेकर यांचे आयुष्य किमान दहा वर्षांनी वाढेल. पण दुर्दैवाने तसे घडले नाही.
शुक्रवारी मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत होती. तरीही कणेकरांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेस आवर्जून उपस्थित राहून आपल्या लाडक्या लेखकाचे साश्रू नयनांनी अंत्यदर्शन घेतले.