
यावेळेस अजित पवार आणि रोहित पवारांची भेट... भेटीनंतर काय म्हणाले रोहित पवार?
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला पाठिंबा दिल्यापासून राष्ट्रवादीत (NCP) पडलेल्या फुटीनंतर अनेक राजकीय वादळे आली. काका - पुतण्याच्या भेटीनंतर आज दुसर्या पिढीतील काका - पुतण्याच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार व त्यांना पाठिंबा दिलेल्या सर्व आमदार व मंत्र्यांनी वाय. बी. सेंटरला जाऊन शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधीमंडळात आपल्या काकांची म्हणजेच अजित पवार यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. या भेटीचे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, तसेच त्यांनी एकत्र जेवण केल्याचेही कळले आहे. दरम्यान, भेटीनंतर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही," असं ते यावेळी म्हणाले. मतदारसंघातील वेगवेगळ्या मुद्द्यांसदर्भात ही भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. एमआयडीसीच्या मुद्द्यावर रोहित पवार जोरदार टीका केली होती. याबाबत त्यांनी एक दिवसाचं आंदोलन देखील केलं होतं. कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नसल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या संदर्भात बैठक लावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कदाचित प्राथमिक भेट ही उपमुख्यमंत्र्यांसोबत असावी असं म्हटलं जात आहे.
राजकीय मतभेद आहेत पण...
भेटीनंतर रोहित पवार म्हणाले की, "स्पर्धा परीक्षेसाठी १००० रुपये घेतले जातात, याबाबत उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ६०० रुपये भरले की कितीही वेळा परीक्षा देता येते. तशाच पद्धतीने आपल्याकडे राबवावी, यासाठी दादांशी चर्चा केली. MPSC साठी पाठपुरावा घेतला, लक्ष घालण्याची विनंती केली. पीक विमा भरताना इंटरनेट डाऊन असल्याने अनेकांना विमा भरता आला नाही, त्यात मुदत वाढवण्याची मागणी केली. या सरकारमध्ये एकमेव अजित दादा असे आहेत. जे काम मार्गी लावू शकतात. आम्ही एकत्र जेवण केलं. राजकीय मतभेद आहेत… पण, कौटुंबिक संबंधात ते येऊ नयेत, याची आम्ही काळजी घेतो. या भेटीत आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.", असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.