मुंबई : मुंबईसह राज्यातही सलग दुस-या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतीय हवामान विभागाने आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. कोकणातील मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुधडी भरुन वाहत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून, गुरुवारी (ता. २७) पहाटेपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे काही रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. कुडाळ येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. वादळीवाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. मुळशी घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे. नाशिकमध्ये संततधार, तर इगतपुरीमध्ये जोरदार वृष्टी झाली.
हवामान विभागाने उद्या, शुक्रवारीही नागपूरसह संपूर्ण विदर्भात ऑरेंज व यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसाने नागपूरकरांची अक्षरशः झोप उडविली. झोपडपट्ट्यांसह अनेक वस्त्या व घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना चांगलाच फटका बसला. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दहावीचा पेपर पुढे ढकलला
राज्यभरात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने दहावीच्या पुरवणी परीक्षेतील सामाजिक शास्त्रे १ इतिहास आणि राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर आता गुरुवारी ३ ऑगस्टला सकाळी ११ ते १ या वेळेत होणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
अनेक दिवसानंतर परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस होत आहे. यामुळे पीक बहरली आहेत. नागपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. हिंगणा भागातील वेणा नदीला पूर आला आहे. यामध्ये काही नागरिक अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
अहमदनगर शहरसह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिना लोटला तरीही अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अहमदनगर शहरासह कर्जत-जामखेडचा काही भाग, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव तालुक्यात दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र, आज जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उशिरा का होईना दक्षिण नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. नगर शहरात पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे.