पुणे: पुण्यातील मेट्रोच्या रखडलेल्या विस्तारित मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्टला होणार आहे. ते बटन दाबतील आणि अवघ्या तासाभरात वनाज ते थेट पीसीएमसी या मार्गावर मेट्रो व्यावसायिक तत्त्वावर सुरू होईल. तसेच या मेट्रोसाठी शनिवार, रविवारी तिकीट दरात महामेट्रोने सर्व प्रवाशांसाठी ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. महामेट्रोचे ऑपरेशन विभागाचे संचालक विनोदकुमार अग्रवाल व जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली.
वनाज ते पीसीएमसी या मार्गाचे नियमित तिकीट ३५ रुपये असेल, शनिवार व रविवार त्यात ३० टक्के सवलत मिळेल. वनाज ते सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंतचे तिकीट २५ रुपये असेल व त्यातही शनिवार, रविवार तिकीट दरात ३० टक्के सवलत असेल. तिकिटे ऑलनाइन पद्धतीनेही मिळतील, तसेच त्यासाठी खास मास्टर कार्डही काढण्यात येणार आहे. स्थानकांपर्यंत पीएमपीएमएलसह काही खासगी वाहनांची फिडर सेवा असेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, याच दिवशी पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचा दौरा निश्चित झाला असला तरी कार्यक्रमांच्या वेळा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.