वनडेत पहिल्यांदाच घेतले ७ किंवा त्याहून अधिक बळी
बार्बाडोस (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी भारताने एकतर्फी जिंकला. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव-रवींद्र जडेजा जोडीने ७ फलंदाजांना माघारी धाडले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डावखुऱ्या भारतीय फिरकी जोडीने ७ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बार्बाडोस सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट मिळवल्या. तर रवींद्र जडेजाने ३ फलंदाजांना माघारी धाडले. या कामगिरीसह जडेजा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. जडेजाने कॅरेबियन संघाच्या ४४ फलंदाजांना माघारी धाडले. तर कपिल देवने ४३ बळी घेतले आहेत. या यादीत अनिल कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी ३७ विकेटसह चौथ्या आणि हरभजन सिंग ३३ विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे.
पहिल्या वनडेत कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने ३ षटकांत ६ धावा देत ४ बळी घेतले. कुलदीपने सातव्यांदा चार विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक वेळा चार बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चहलच्या बरोबरीने आला आहे. चहलनेही ७ वेळा ४ विकेट घेतल्या आहेत.
किशनचे अर्धशतक
रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचा संघ अडकला. ११४ धावांवर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ गारद झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होपने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. होपचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० पेक्षा धावसंख्या पार करता आली नाही. कुलदीप यादव याने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजचा संघ २३ षटकांत ११४ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताला विजयासाठी ११५ धावांचे आव्हान मिळाले आहे. भारताने २२.५ षटकांत ५ विकेट गमावत विजयी लक्ष्य गाठले. भारताच्या इशान किशनने ५२ धावांची खेळी खेळली.