अजित पवारांच्या बैठकीत ‘हे’ दोन महत्त्वाचे निर्णय…
मुंबई : राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या (Agricultural courses) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या (Engineering) व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पर्याय निवडता येणार आहेत. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होऊ शकेल.
अजित पवार यांनी आज बोलावलेल्या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे, उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीला दोन्ही विभागांचे सचिवदेखील उपस्थित होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात ज्या अडचणी येतात त्या समोर मांडण्यात आल्या. त्यामुळे आज अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या धरतीवर कृषी अभ्यासक्रमासाठी देखील रिक्त जागांप्रमाणे पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश अजित पवार यांनी दिले. त्यामुळे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना राखीव जागांचा लाभ मिळणार आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उत्कृष्ट कामगिरी असलेल्या खाजगी कृषीसमूहांनाही कृषी विद्यापीठांचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांमुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra