
एकाला बेड्या घालण्यात पोलिसांना यश
वाशिम : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातांच्या मालिकेनंतर आता उभ्या वाहनातून डिझेल चोरणार्या टोळीचे (Theft of diesel) प्रकरण चर्चेत आले आहे. या टोळ्या रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या ट्रक आणि कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टँकमधून पाईप आणि मोटरच्या साहाय्याने डिझेल चोरतात. आज सकाळी समृद्धी महामार्गावर कारंजा जवळ पुन्हा डिझेल चोरणाऱ्या एका आरोपीला गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी हे तीन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री वाशिमच्या (Washim) वनोजा जवळ पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना एका गाडीतून डिझेल चोरीला जात असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी या चोरांचा पाठलाग सुरु केला. या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.
अनेकदा या महामार्गावर चोरीच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यातच आता डिझेल चोरीच्या घटनांनी नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झाले असल्याचं म्हटलं जात आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे.