- मोहन अनिल पुराणिक
अशाश्वत अशा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या उपासना, संस्कार, ईश्वर स्तुती, स्तोत्रपाठ, दानधर्म, तीर्थयात्रा असे सर्व संस्कार आपल्याला दिसून येतात. याच संस्काराचा एक भाग म्हणजे दर ३ वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास होय. हा अधिक मास आपल्याकडे अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास इत्यादी नावांनी ओळखला जातो. या वर्षी (२०२३) श्रावण मास अधिक मास झाला असून श्रावण मासात शिवउपासनेचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आपल्याकडे आहे. हा श्रावण अधिक मास झाल्याने हरिहर योग आपण म्हणू शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे असते चंद्र वर्ष हे ३५४ दिवसांचे असते. या सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यामध्ये ११ दिवसांचा फरक असतो.
एकूण ३ वर्षांत हा फरक ३३ दिवसांचा असतो. हा ३३ दिवसांचा मेळ साधन्यासाठी दर ३ वर्षांनी हा अधिक मास येतो. दर महिन्याला सूर्य संक्रमण हे प्रत्येक राशीतून होत असते; परंतु अधिक मासात हे सूर्य संक्रमण दोन महिने एकाच राशीतून होत असते म्हणून या अधिक महिन्याला मल मास असेही म्हणतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन यापैकी एखादा महिना अधिक मास असतो या काळात सूर्य संक्रमणाची गती ही ३० दिवसांची असते (इतर महिन्यांत २८-३० दिवस असते) या अधिक मासात प्राणप्रतिष्ठा, गृहारंभ, भूमिपूजन, वास्तुशांति, विवाहसंस्कार, उपनयन ही कार्य वर्ज्य करावी. ही कार्य वर्ज्य केल्याने अधिक मासाला वाईट वाटले, अधिक मास निराश झाला आणि विष्णूंना भेटून सांगू लागला की, अधिक मासात कोणतेही मंगल कार्य करत नाही असे दुःख अधिक मासाने सांगितल्यानंतर भगवान विष्णूने अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे नाव दिले. म्हणून अधिक मास सर्वोत्तम मास झाला. म्हणून अधिक मासात भरपूर दानधर्म करतात. पुण्य कर्म करतात. या अधिक मासात जावयाचे पूजन करून जावयास, ब्राम्हणास ३३ अनारसे किंवा ३३ बत्तासे, दीपदान, दक्षिणादान, वस्त्रदान, पात्रदान करावे (३३ अनारसे ३३ बत्तासे सच्छिद्र दान द्यावे).
अंकशास्त्रानुसार ३ हा अंक गुरूचे प्रतिनिधित्व करतो. गुरू हा धन, संपत्ती, सुवर्ण, ज्ञान या गोष्टींचा कारक आहे. ३३ या अंकात ३ अंक ३+३(२) वेळा आहे म्हणजे ३ वर्षांतल्या ३३ दिवसांवर गुरू ग्रहाचा अमंल दिसून येतो. ३+३ या अंकाची बेरीज ही ६ येते. ६ हा अंक शुक्राचे प्रतिनिधित्व करतो. शुक्र ग्रह हा वैवाहिक सौख्य सर्व प्रकारचे ऐच्छिक सौख्य प्रदान करतो म्हणून गुरू व शुक्र ग्रहाचे बल ३३च्या पटीने दान केल्याने आपणास प्राप्त होते. म्हणून ३३ अनारसे, ३३ बत्तासे, वस्त्र, पात्र, दक्षिणा, दीपदान हे जावयास, ब्राह्मणास अधिक मासात दान द्यावे. या अधिक मासाचे महत्त्व श्रृतीग्रंथ असे सांगतात –
आयः पुमान् यशःस्वर्गं कीर्तिम् पुष्टीम् श्रीयंम्।
बलम् पशु सुखम् धनम् धान्यम् प्रप्नुयात
विष्णु पूजनात्॥
अधिक मासात, पुरुषोत्तम मासात विष्णू पूजन केल्याने आयू, यश, कीर्ती, बल, पुष्टी, श्री, धन, धान्य, पशु सुख इत्यादी प्राप्त होते. हे सर्व आपणास प्राप्त होवो, ही प्रार्थना.
शुभं भवतू॥
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra