- ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
भगवद्गीता मराठीत रूपांतरित करताना त्यातील संवादमय, नाट्यमय रचना यामुळे ज्ञानदेवांचा वाचकांवर प्रभाव अधिक पडतो. आपल्या ‘ज्ञानी’ डोळ्यांनी काही गोष्टी अचूक हेरून ते त्यातून वाचक, श्रोते यांची ज्ञानदृष्टी व्यापक करतात, विस्तारित करतात. शिवाय ज्ञानेश्वरीत वेळोवेळी दिलेल्या दाखल्यांतून त्यांची विलक्षण नम्रता दिसून येते. त्यांची ही नम्रता आपण अंशतः जरी बाणवली तरी आयुष्य सुखी होईल.
विरोधाभासातून सौंदर्य खुलवणं ही ज्ञानदेवांची खास लकब! त्याचप्रमाणे विचार स्पष्ट करताना एकामागोमाग एक अप्रतिम दाखले देणं हीसुद्धा त्यांची खासियत! हे सारं करूनही मनात अतिशय नम्र भाव!
‘महामुनी व्यासांनी भगवद्गीता या महान ग्रंथाची रचना केली. म्हणून माझ्यासारख्या पामराने त्या ग्रंथाचं मराठीत केलेलं रूपांतर अयोग्य नव्हे’ हा विचार मांडताना ज्ञानदेवांच्या रसवंतीला असा बहर येतो! त्यापैकी ही ओवी पाहूया –
‘अरुण हा सूर्याच्या जवळ आहे, म्हणून सूर्यास पाहतो आणि भूतलावरील मुंगी पाहत नाही काय?’
ओवी अशी –
अरुण आंगाजवळिके। म्हणोनि सूर्यातें देखें ।
मा, भूतळींची न देखे। मुंगी काई?॥ ओवी क्र. १७१९
‘मा’ या शब्दाचा अर्थ ‘नाही’ असा आहे.
अरुण हा सूर्याचा सारथी, आकाशात राहणारा, तेजस्वी, सूर्याच्या सन्निध (जवळ) असणारा. याउलट मुंगी ही भूतलावरील एक अतिशय लहान जीव. कुठे आकाशीचा अरुण नि कुठे एक यःकश्चित मुंगी!
अशा दोन परस्परविरोधी, पराकोटीच्या वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी! ज्ञानदेव त्या एकत्र आणतात त्यांच्या ‘ज्ञानी’ डोळ्यांनी! त्यातून वाचक, श्रोते यांची ज्ञानदृष्टी व्यापक करतात, विस्तारित करतात. ओवीच्या शेवटी येतं ‘न देखे मुंगी काई?’ मुंगी पाहत नाही काय? म्हणजेच मुंगी पाहते; परंतु अशी नकारार्थी रचना केल्यामुळे ज्ञानदेव जे सांगू पाहतात, त्याला अधिक ठसठशीतपणा येतो. वाचकांवर त्याचा प्रभाव अधिक पडतो याचं कारण त्यातील संवादमय, नाट्यमय रचना!
पुन्हा यात त्यांची विलक्षण नम्रता आहे. व्यासमुनींना ते ‘अरुण’ याची उपमा देतात. स्वतःला मुंगीची उपमा देतात, ज्ञानाचा महामेरू असूनदेखील. पुन्हा या दाखल्यात म्हटलं आहे की, अरुण सूर्याला पाहतो, त्याप्रमाणे मुंगीदेखील सूर्याला पाहते. याचा अर्थ असा – व्यासमुनींनी ‘अरुणा’प्रमाणे तेजस्वी डोळ्यांनी ज्ञान पाहिलं. त्यातून ‘महाभारत’ हा ग्रंथ संस्कृतमध्ये आणला. ज्ञानदेवांनी त्यांच्या डोळ्यांना दिसलेलं ज्ञान ‘ज्ञानेश्वरी’ रूपाने मराठीत आणलं. यातून व्यासमुनींविषयीचा ज्ञानदेवांचा प्रचंड आदर व्यक्त होतो, तर स्वतःविषयीचा विलक्षण विनय. पुढे समुद्र आणि डबकं, गरूड आणि लहान पाखरू, पाण्याचा कलश आणि चूळ, मशाल आणि वात, बाप आणि मूल अशा दाखल्यांनी व्यासांना ते खूप उंचीवर नेऊन ठेवतात आणि स्वतःला सामान्य, लहान करतात.
पुन्हा आपल्याकडून झालेलं हे काम आहे, त्याचं श्रेय व्यासमुनी व आपले गुरू निवृत्तीनाथ यांना देतात. ते म्हणतात, सर्व जगावर उपकार करणारे समर्थ सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात शिरून वास करीत आहेत (ओवी क्र. १७२८) तेव्हा आता आयती तयार जी गीता, ती मी जगताला मराठी भाषेतून सांगण्याला समर्थ झालो आहे. यात आश्चर्य ते काय? (ओवी १७२९)
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथु ।
राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां॥ (ओवी क्र. १७२८)
आता आयती गीता जगीं । मी सांगे मर्हाठिया भंगी ।
तेथ कें विस्मयालागीं । ठावो आहे॥ (ओवी क्र. १७२९)
माऊलींची ही नम्रता,
अंशतः तरी बाणवावी आता..
सुख येईल मग जीवनी पाहता…
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra