मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पाऊस जराही उसंत न घेता कोसळत असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पावसाचा वाढता जोर पाहून हवामान विभागाने रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट वाढवण्यात आला आहे.
येत्या तीन-चार तासांमध्ये हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. आझाद मैदान, काळबादेवी, भायखळा, दहिसर, बोरिवली, कांदिवली या भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक अत्यंत संथगतीने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी भरलेल्या भागांमधून वाहन नेऊ नका. तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
मुंबईच्या लाईफलाईनची स्थिती काय?
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन उपनगरीय रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा सुरळीत होती. परंतु, दुपानंतर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाल्याने रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक संथ झाली आहे. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट आणि मरिनलाईन्स स्थानकांत पाणी साचले आहे. बोरिवली स्थानकांतही ट्रॅकवरील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने सुरु आहे. तर हार्बर रेल्वेच्या सेवेवरही काहीप्रमाणात परिणाम झाला आहे.