बार्बाडोस (वृत्तसंस्था) : दुखापतीचे ग्रहण टीम इंडियाची पाठ सोडत नसल्याचे दिसते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी गुरुवारी भारताचा वेगवान गोलदांज मोहम्मद सिराजचा घोटा दुखत असल्याने त्याला वन डे मालिकेतून रिलिज करण्यात आले. सिराजचा घोटा दुखत असल्याचे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच आशिया चषक आणि विश्वचषकामुळे सिराजला आराम मिळण्यासाठीही त्याला रिलिज करण्यात आल्याचे समजते.
मोहम्मद सिराजने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी घोट्याच्या दुखण्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला एकदिवसीय मालिकेतून मालिकेतून आराम देण्यात आला असल्याचे बीसीसीआयने सांगितले. मात्र, त्याच्या बदलीची घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सोडण्यात आले आहे. सिराजला घोट्यात दुखत असून खबरदारी म्हणून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सिराजला मायदेशी पाठवण्यात आलेय, मात्र बदली खेळाडू निवडण्यात आलेला नाही.