Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखLandslides: निसर्गाशी जुळवून घेताना...

Landslides: निसर्गाशी जुळवून घेताना…

  • अरुण बापट, ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ

गेली काही वर्षे पावसाळ्याचा बदलता पॅटर्न पाहायला मिळत असून त्यामुळे होणारी मोठी हानीदेखील लपून राहिलेली नाही. भूस्खलनामुळे संपूर्ण गाव डोंगराखाली गडप झाल्याच्या इर्शाळवाडीच्या घटनेनंतर तर याची तीव्रता वाढल्याचे दिसते. याखेरीजही पावसाळ्यात अनेक प्रकारचे अपघात जनजीवन विस्कळीत करताना दिसत आहेत. म्हणूनच यावर सखोल संशोधन आणि अभ्यासाची गरज लक्षात घ्यायला हवी.

इर्शाळवाडीची घटना माळीणच्या दु:खद स्मृती जागवून गेली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माळीण या गावाप्रमाणेच इर्शाळवाडीची घटनाही भूस्खलनामुळेच घडली असून या गावातील बहुतांश घरे कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली दडली. यात घडलेली जीवित आणि वित्तहानी बरीच मोठी असून वारंवार घडणाऱ्या अशा घटना पावसाळ्यातील धोके वाढवत आहेत, असेही आपण म्हणू शकतो. तसे बघायला गेल्यास इर्शाळवाडी आणि माळीण या दोन्ही भागांमधील प्राकृतिक रचना वेगळी आहे. मात्र भूस्खलनाचा धोका आधी समजू शकतो. त्यासाठी साधारणत: खडकामध्ये २० मीटर खोलीवर ड्रिलच्या सहाय्याने एक खड्डा खणून सेन्सर लावला जातो. वर त्याला सोलार पॅनेल लावलेले असते. त्यामुळे हा सेन्सर कधीच फेल होत नाही. भूगर्भात हालचाली सुरू झाल्या, तर सेन्सरमधून निरीक्षण कक्षाकडे संकेत पाठवला जातो. त्यानुसार तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार काम केले जाते आणि अधिकाधिक भाग सुरक्षित ठेवून हानी कमी करण्यास पुरेसा अवधी हाती मिळतो. अलीकडे या यंत्रणेत आणखी सुधारणा झाली असून आता जवळपासच्या साधारणत: ५० किलोमीटर परिघामधील सर्व मोबाइलवर हा तातडीचा संकेत जातो आणि पुढील वीस तासांमध्ये गंभीर घटना घडण्याचा संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. साहजिकच या वीस तासांच्या अवधीत आवश्यक आणि किमती सामानानिशी संबंधित धोकादायक ठिकाण सोडून दूर जाता येते. म्हणूनच सध्या भूस्खलनाच्या प्रकारांमधील वाढ बघता अशा घटना घडण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी अशी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे धोक्याचा संकेत मिळताच ५० ते ७० किलोमीटरच्या परिसरातील लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात केवळ डोंगरी भागातच नव्हे तर रस्त्यांवरही अनेक प्रकारच्या दुर्घटना घडतात. माती खचणे, भराव खचणे, भूस्खलन, झाडे पडणे, पूरस्थिती निर्माण झाल्याने गावांचा संपर्क तुटणे यांसारखी नानाविध संकटे जनजीवनात अडथळे निर्माण करतात. त्यासाठी आपण तयार राहण्याची गरज लक्षात घ्यायला हवी. उदाहरणार्थ, भूगर्भात धोकादायक हालचाल जाणवल्यास तत्काळ वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे आहे. बाधित भागातून जाणारी वाहने थांबवणे आणि सुरक्षित मार्गाने वळवल्यास पुढील अनर्थ टाळणे सहजशक्य होते. अनेक ठिकाणी रस्ता तयार करताना खडक कापतात. खडक अगदी सरळ रेषेत कापला जातो. अशा ठिकाणी भूस्खलनाचा मोठा धोका असतो. कापताना तेच वळण ६५ ते ७० अंश कोनामध्ये असेल, तर संबंधित भागांमध्ये भूस्खलन कमी होते वा झालेच तर होणारी पडझड रस्त्याच्या पलीकडील बाजूने होते. ती रस्त्यावर येत नाही. म्हणूनच यापुढे डोंगर कापून रस्ते निर्माण करताना ही काळजी घेण्याची गरजही लक्षात घेणे आवश्यक आहे.

मुळात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून कितीही पूर्वतयारी केली वा आवश्यक ती सर्व काळजी घेतली तरी काही वेळा काही अप्रिय घटनांचा सामना करावाच लागतो. अशा वेळी लगेच काही दिवस त्यावर बरीच चर्चा होते. त्यासंबंधी माध्यमांमध्ये छापून येते. झालेल्या नुकसानीबद्दल वक्तव्य होते आणि पीडितांना भरपाई देण्यासाठी काही संस्था, सरकार पुढे येते. मात्र काही काळातच भावनांचा हा पूर ओसरतो. समाज या घटना विसरू लागतो. साहजिकच यामुळे संबंधित भागातले घरे गमावलेले, रोजगार संपलेले लोक हताश होतात. हे टाळण्यासाठीही आधीपासून व्यवस्थापनाचे सोपे उपाय योजण्याचे धोरण राबवायला हवे. उदाहरणार्थ, अनेक कामे असणाऱ्या मोठ्या लोकांपेक्षा आपण विज्ञार्थ्यांना शिकवले आणि धोक्यांप्रती सजग करून एखादी घटना घडल्यास काय करायचे याचे प्रशिक्षण दिले, तर चांगला उपयोग होतो, असे आमचा अनुभव सांगतो. आम्ही हिमाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये हा प्रयोग करून पाहिला आहे. हे विद्यार्थी प्रत्यक्ष कामे करू शकत नसले तरी संकटावेळी काय करायचे हे ठाऊक असल्यामुळे आपत्तीप्रसंगी सजग राहतात आणि दुर्दैवाने आपत्ती कोसळली, तर योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतात. यामुळे त्यांच्याबरोबरच घरातील ज्येष्ठांचेही प्राण वाचू शकतात. कोणतीही दुर्घटना घडली की रॅपिड अॅक्शन फोर्स वा अन्य सहाय्यक यंत्रणा येण्यास बराच वेळ लागतो. खेरीज आत्तासारखे बाधित स्थळ दूर असेल तर तिथपर्यंत पोहोचणेही काही वेळा कठीण असते. अशा वेळी हे विद्यार्थी मोठी मदत करू शकतात. केवळ भूस्खलनच नव्हे तर पावसाळ्यातील अन्य धोकेही त्यांनी अशाच प्रकारे लक्षात घेतले तर बऱ्याच दुर्दैवी घटना टळणे सहजशक्य आहे.

गुजरातमध्ये आम्हाला असाच एक प्रश्न पडला होता. तिथेही विद्यार्थीवर्गाला तयार करण्याचे तंत्र कामी आले. तेव्हा माझे क्षेत्र भूकंपावरील संशोधनापुरतेच मर्यादित होते. गुजरातमध्ये मी आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिण्याचे काम करत होतो. गुजराती भाषेमध्ये त्याच्या अनुवादाचे काम सुरू होते. तिथे आम्ही विद्यार्थीवर्गाला प्रशिक्षित करण्याचा आणि त्यांच्या सावध राहण्याच्या शक्यतेचा वापर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. असाच प्रयोग आम्ही नागालँड आणि आसाममध्ये केला. म्हणजेच ही पुस्तके आपत्तीप्रवण अनेक राज्यांमधील विद्यार्थ्यांनी वाचली. त्यातून ते बरेच काही शिकू शकले. खेरीज अशी माहितीपर आणि संकटकाळात कसे वागावे हे सांगणारी पुस्तके केवळ मुलेच वाचतात असे नाही. घरातील ज्येष्ठही वाचतात आणि त्यांच्या यासंबंधीच्या ज्ञानातही मोठी भर पडू शकते. थोडक्यात, आपत्ती घडून गेल्यानंतर काम करण्यापेक्षा आपत्तीच्या व्यवस्थापनावर आधी काम केले आणि आधी सांगितलेल्या तांत्रिक मदतीने आपत्तीची पूर्वकल्पना मिळवली, तर पावसाच्या बदललेल्या पॅटर्नशी मिळवून घेत आपण सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करू शकतो.

अलीकडच्या काळात कमी काळात खूप जास्त पावसाची नोंद होताना दिसत आहे. खेरीज पावसाची अनियमीतताही वाढली आहे. पावसाचे प्रमाण कुठे अत्यंत कमी तर कुठे अत्यंत जास्त असण्याचे प्रकारही वारंवार पाहायला मिळत आहेत. हे सगळे बदलते नैसर्गिक परिणाम वा घटनासाखळी असल्याने परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही. अलीकडे आपण जयपूरसारख्या ठिकाणीही नदीला पूर आलेला पाहिला. विदर्भात पुराच्या पाण्याने रस्ता बंद केल्याचे प्रकारही आपण पाहिले. प्रचंड पावसामुळे पाणी शेतात शिरल्याच्या घटनादेखील आपण पाहिल्या. म्हणजेच आता अशा घटना वारंवार होणार असल्याचा अंदाज आपण लक्षात घ्यायला हवा. टाळता येणार नसल्यामुळे त्या स्वीकारण्याखेरीज तरणोपाय नसतो. म्हणूनच निसर्गाचे बदलते रूप लक्षात घेता अडथळे वा अडचणी कशा प्रकारे वाढू शकतील याचा अभ्यास करण्याची गरजही आता लक्षात घ्यायला हवी.

लोकांची मानसिकता दोन प्रकारची असते. संकटग्रस्त लोक प्रचंड घाबरलेले असतात. जीवलगांच्या जाण्यामुळे ते दु:खी असतात. त्यांचा दु:खावेग प्रचंड असतो. अशा वेळी त्यांच्या आजूबाजूचे लोक घटनांचा सगळा भार सरकारच्या माथी मारून मोकळे होतात. सरकारने काही केले नाही, असाच अनेकांचा होरा असतो. पण ही बाब अयोग्य वाटते कारण सरकार प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी पुरे पडू शकत नाही. पाऊस खूप पडला, शेतीचे नुकसान झाले तरी सरकार जबाबदार आणि पाऊस पडला नाही, पिके सुकून गेली तरी सरकार जबाबदार असे म्हणणे अवाजवी ठरेल. दुर्घटनांमागे निसर्गाच्या लहरीपणाप्रमाणेच माणसाच्या बऱ्याच चुका कारणीभूत ठरत असतात. म्हणूनच या गोष्टींचा विचार सर्वांगाने करणे गरजेचे आहे. परिस्थितीला दोष देणे नेहमीच सोपे असते पण अशा प्रकारे दुर्घटनेसाठी तयार असणे महत्त्वाचे आहे. आपत्ती व्यवस्थापन हा विषय आपल्याकडे गांभीर्याने घेतला जात नाही. तहान लागली की विहीर खणण्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे बदलत्या काळातील बदलती गरज लक्षात घेऊन आपत्तींसाठी समाजाने तयार राहणे आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांचा प्रसार करणे ही गरज बनली आहे.
(अद्वैत फीचर्स)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -