मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या (NCP) फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गट विरुद्ध शरद पवार गट असा कायदेशीर लढा उभा राहण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाने पक्षावर केलेल्या दाव्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपणच आहोत हा दावा अजित पवारांनी केला आहे, त्याबाबत आपलं उत्तर द्या असं आयोगानं या नोटीशीत म्हटलं आहे. त्यासाठी ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
२ जुलै रोजी, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ५ जुलै रोजी अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्यात आली होती. ३० जून रोजीच पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. ४० आमदारांच्या सह्यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचाही दावा करण्यात आला होता. आता या सगळ्याबाबत शरद पवार गटाचं नेमकं आयोगासमोर म्हणणं काय आहे, हे त्यांना कळवावं लागणार आहे.
शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, देवदत्त कामत हे कायदेशीर बाजू सांभाळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात आता शिवसेनेपाठापोठ राष्ट्रवादीच्या चिन्हासाठीची लढाई लवकरच सुरु होण्याची चिन्हं दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं शिंदेंच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यामुळे आता अजित पवारांच्या बाबतीत निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतं, हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे.