Arpit kala kendra : मुसळधार पावसामुळे कळवे येथील अर्पित कला केंद्राचे नुकसान
July 27, 2023 01:35 PM 241
गणेश मूर्ती भिजल्या; पाहा व्हिडीओ...
जोहे : रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेली अनेक दिवस पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे कळवे येथे घर पडून घराचे व श्री गणेश मूर्ती कारखाना अर्पित कला केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र पहाटे कारखान्यात कुणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे.
मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे पेण तालुक्यातील शेतांसह सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. ग्रामीण भागांतील घरांत व दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. जोहे, हमरापुर विभागातील श्री गणेश मूर्ती कारखानदारांचे खूप मोठे नुकसान होत आहे. आज पहाटे मुसळधार पावसामुळे कळवे येथील सागर पाटील यांचे घर पडून त्यांच्या अर्पित कला केंद्र या श्री गणेश मूर्ती कारखान्याचे मोठे नुकसान झाले. सदर कारखान्यात असलेल्या माती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अनेक गणेश मूर्ती भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबतची माहिती पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ तलाठी, सर्कल यांना घटनास्थळी पाठवून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे घर पडून मोठी वित्त हानी झाली असल्याने कारखानदार सागर पाटील हे हवालदिल झाले आहेत.