पेण: विषारी सर्प दंशांने अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यातील जिते गावात घडली आहे. दरम्यान, योग्य उपचार न झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सारा ठाकूर (वय-१२ वर्षे) हिला मंगळवारी रात्री झोपेत असताना मण्यार जातीच्या विषारी सर्पाने दंश केला. तिला तातडीने उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून अँटी स्नेक वेनिन इंजेक्शन दिले. तसेच यावेळी एका खासगी बालरोगतज्ज्ञ डॉक्टरचा सल्लाही घेण्यात आला. मात्र विषाची तीव्रता अधिक असल्याने साराला अलिबाग येथे पाठविण्यात आले. यावेळी अलिबाग जिल्हा रुग्णालायत घेऊन जात असताना शासकीय १०८ नंबरच्या रुग्णवाहिके मधील ऑक्सिजन संपल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर तिला कळंबोली येथील एम. जी. एम. रुग्णालयात घेऊन जात असताना साराचा मृत्यू झाला.