
औरंगाबाद: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील एका खाजगी शाळेकडून विद्यार्थ्यांनी टिळा, गंध लावून येण्यास मनाई केली व तसे लेखी पत्रच पालकांना पाठवले. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.
पैठणच्या बिडकीन गावात महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल आहे. काल शाळा प्रशासनाकडून पालकांना एक पत्र पाठवण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांना स्वच्छते सहीत नीटनेटकेपणाने शाळेत पाठविणे याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. या सूचना करतांना पालकांनी मुलांना कपाळावर कोणत्याही प्रकारचा टिका, रंग, गंध, लावून शाळेत पाठवु नयेत. तसेच हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नये, हातात घडयाळ, स्मार्ट वॉच घालून पाठवू नये, विद्यार्थ्यांच्या कानात कोणत्याही प्रकारच्या बाळया नसाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.
मुलांना शाळेत पाठवताना कोणत्याही प्रकारचा कपाळावर टिका, रंग, गंध आणि हातात, कडे, दोरे, बांधुन पाठवू नयेत अशा सूचना करण्यात आल्याने मराठा क्रांती मोर्च्याचा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली. पालकांसह मराठा क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते आज थेट महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलमध्ये पोहचले. यावेळी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. तर असे कोणतेही नियम आम्ही मुलांवर बंधनकारक केले नसून, फक्त त्याबाबत आवाहन केले असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली. तर शाळा प्रशासनाने काढलेलं पत्र मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि पालकांनी केली आहे.
पालक नाराज!
दरम्य़ान, शाळेच्या या सुचनांवर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पालकांनी शाळेत जाऊन ही आपली संस्कृती असून, मुलांनी गंध लावल्याने शाळेला काय अडचण आहे, असा प्रश्न केला. मात्र, पत्रात फक्त सूचना करण्यात आल्या असून, त्या बंधनकारक नसल्याची सारवासार शाळेतील शिक्षकांनी केली.