अष्टपैलुत्व काय असते? याचे उत्तर म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, लेखक, समीक्षक, कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे नाव चटकन डोळ्यांसमोर येते. सिनेमा, क्रिकेट, समाजकारण आणि राजकारण या सर्व क्षेत्रांत स्वैर मुशाफिरी करणाऱ्या शिरीष कणेकर यांच्या निधनाचे वृत्त आले अन् गेल्या ३५ वर्षांचा काळ डोळ्यांसमोरून तरळून गेला. गेल्याच महिन्यात ६ जून रोजी त्यांनी ८० वा वाढदिवस साजरा केला होता. आपल्या खास शैलीतून टोकदार लिखाण करणाऱ्या आणि विविध समस्यांवर विनोदी शैलीतून बोट ठेवणारे लेखक शिरीष कणेकर हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.चित्रपट, संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींवर खुमासदार लेखन करून त्यांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले होते. समाजकारण, राजकारण, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांतील विविध घडामोडींवर त्यांचे लेखन वाचकप्रिय झाले होते. त्यांचे कणेकरी, माझी फिल्मबाजी नावाचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय होते. कणेकर हे कोकणातले म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पेणचे असल्याने सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपणा तर कधी तिरकसपणा हा त्यांच्या लेखणीत नेहमीच डोकावत असे. आपले मुद्दे जोरकसपणे मांडणे आणि पटतील अशा तऱ्हेने मांडणे हे त्यांच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्यच. किंबहुना हे त्यांच्या लिखणाचे जणू पैलूच बनले होते आणि लोकांनाही ते भावतही होते. क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण हे तिन्ही त्यांचे आवडीचे विषय होते.
नर्मविनोदी शैलीत लिहिता लिहिता एखाद्याच्या डोळ्यांत टचकन पाणी आणण्यात कणेकरांची हातोटी होती. त्यांच्यावर जणू सरस्वतीच प्रसन्न झाली होती. कणेकर यांनी लेखणी हातात घेताच एकापाठोपाठ एक शब्द अपसूकच फेर धरू लागायचे. इतकी त्यांच्या लेखनाची ताकद होती. क्रिकेट व सिनेसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय होते. भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लतादीदी आणि अभिनयाचा बादशहा दिलीप कुमार म्हणजे त्यांचा विक पॉइंटच. या दोघांवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या खुमासदार आठवणी आणि किस्से सांगताना कणेकर देहभान विसरून जात. तहान – भूक विसरून ते भडाभडा बोलायला लागत, तशी त्यांची लेखणीही सरसर चालू लागे. या महान व्यक्तिमत्त्वांचे पैलू उलगडून सांगताना किंवा लिहिताना त्यांच्या स्वभावाचा परिचयही ते बेमालूमपणे करून देत. लतादीदींनी अनौपचारिक गप्पा मारताना चित्रपट, संगीत क्षेत्रातील अनेक किस्से त्यांना सांगितले होते. मात्र ते लोकांसमोर मांडताना कणेकरांनी त्यात कमालीची रंजकता आणली आणि रसिकांना ती प्रचंड भावली. पण ते करताना त्यांनी चुकूनही कधी अतिशयोक्ती किंवा विपर्यास केलेला दिसला नाही. त्यांनी पत्रकार म्हणून इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांसाठी काम केले. त्याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन खूप गाजले. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांच्या लेखांनाही चांगली प्रसिद्धी मिळाली. तसेच, ७ नोव्हेंबर १९८७ रोजी त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. भारतीय रंगमंचावर पहिल्यांदा ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ कणेकरांनी आणली. विशेष म्हणजे माझी फिल्लमबाजी, फटकेबाजी आणि कणेकरी या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि सादरीकरण असे सर्वच त्यांनी केले.
यादो की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररूप, फिल्लमबाजी, कल्चर व्हल्चर या नावांनी ते स्तंभलेखन करत. ‘कधीही दारू न प्यायलेला बेवडा’ या शीर्षकाने त्यांनी लिहिलेला केश्तो मुखर्जींवरचा लेख तर असा गाजला की आजही लोकांच्या तो स्मरणात आहे. तसेच दिलीप कुमारचे वर्णन हे ‘बादशाह हा शेवटी बादशाहच असतो’ या शब्दांमध्ये त्यांनी केले होते. विशेष म्हणजे त्यांचा जन्म पुण्याचा आणि ते मूळचे कोकणचे असल्याने पुणेरी ठसका आणि कोकणी तिरकसपणा यांचा गोड मिलाफ त्यांच्या लेखणीत डोकावत असे.
कणेकर यांचे ललित लेखनही खूप गाजले. आंबटचिंबट, इरसालती, एकला बोलो रे, कट्टा, गोतावळा, चर्पटपंजरी, चहाटळकी, चापटपोळी, डॉ. कणेकरांचा मुलगा, फटकेबाजी, नानकटाई ही त्यांपैकीच काही गाजलेली उदाहरणे. त्यांच्या ‘लगाव बत्ती’ या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं. वि. जोशी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता, तर ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात
आले होते.
कणेकर यांना काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांकडून गौरविण्यात आले होते. याशिवाय साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. विविध वृत्तपत्र, मासिकांमधून चित्रपट, साहित्य आणि क्रीडाविषयक क्षेत्रातील अनेक घडामोडींवर त्यांनी केलेले लेखन लोकप्रिय झाले होते. त्यांची ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. षटकार, चंदेरी यांसारख्या मासिकांमधून त्यांनी केलेले लेखन हे कित्येक वाचकांच्या उत्सुकतेचा आणि कौतुकाचा विषय होता. त्यामुळेच की काय त्यांचे लेख वाचण्यासाठी वाचक नेहमीच आतुर असायचे व त्यांच्या नव्या लेखाची प्रतीक्षा करायचे. शिरीष कणेकर यांनी आपल्या खास शैलीतून टोकदार लिखाण केले आहे. तसेच एखाद्या समस्येवर विनोदी शैलीतून बोट ठेवण्यात त्यांची हातोटी होती. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरलेली असतानाच आज मंगळवारी शिरीष कणेकर यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन क्षेत्राने कसदार व्यक्तिमत्त्व गमावले आहे. कणेकरांच्या निधनाने खुमासदार गप्पांचा फड गाजविणारी कणेकरी शैलीच जणू लुप्त पावली आहे. एका खुमासदार कणेकरी पर्वाचा अस्तच झाला, असे म्हणावे लागेल.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…