Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखINDIA: जागावाटप! ‘इंडिया’ची डोकेदुखी

INDIA: जागावाटप! ‘इंडिया’ची डोकेदुखी

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी हटाव या एकाच मुद्द्यावर ‘इंडिया’ नावाच्या बॅनरखाली एकत्र आलेले २६ राजकीय पक्ष भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार कसा देणार, हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. विरोधी पक्षांच्या मतांची टक्केवारी एकत्र केली, तर भाजपचा पराभव होऊ शकतो, असे गृहीत धरून इंडियाची निर्मिती झाली आहे. प्रादेशिक व भाषिक अस्मिता आणि एकाच परिवाराचे नेतृत्व असलेली ‘इंडिया’ भाजपला कशी टक्कर देऊ शकेल? विशेषतः देशातील सहा राज्यांत ज्या प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे, तेथे काँग्रेस पक्षाला जागा वाटपात कसा वाटा मिळेल हा कळीचा मुद्दा आहे. एकास एक या निकषावर इंडियाची उभारणी झाली पण त्याच निकषाची सहा राज्यांत ‘ऐशी की तैशी’ होणार आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

कर्नाटकची राजधानी बंगळूरुमध्ये एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये भाजप विरोधी आघाडीची १८ जुलैला बैठक झाली. पाटणा बैठकीनंतर विरोधी नेत्यांचे हसतमुख चेहरे आणि एकमेकांचे हातात हात घेऊन हात उंचावलेले फोटो झळकले. मोदी हटावचा पुन्हा निर्धार व्यक्त करण्यात आला आणि हाच निर्धार मुंबई येथे होणाऱ्या तिसऱ्या बैठकीत करण्याचे ठरले. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रातील महाआघाडीच्या वज्रमुठीच्या सभांचा जसा अंत झाला तसा निवडणुकीच्या अगोदरच विरोधकांच्या इंडियाचा होणार नाही ना, अशा दिशेने या सर्वांची वाटचाल चालू झाली आहे. इंडियातील घटक पक्षच अनेक राज्यांत एकमेकांच्या विरोधात लढत असतात. सहा राज्यांत हेच घटक पक्ष काँग्रेसच्या विरोधात वर्षानुवर्षे लढत आहेत. ‘एक मतदारसंघ (विरोधकांचा) एक उमेदवार’ असा फॅार्म्युला पाटणा बैठकीत नितीशकुमार यांनी मांडला होता. अशावेळी कोणत्या पक्षाला कोणती जागा सोडायची, हीच इंडियाची मोठी परीक्षा आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॅान्फरन्स व पीपल्स डेमाॅक्रसी पार्टी (पीडीपी) असे तीन पक्ष आहेत. हे तीनही पक्ष इंडियामध्ये आहेत. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या राजकारणात हे तीनही पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. २०१४ मध्ये राज्यात नॅशनल कॅान्फरन्स व काँग्रेसचे सरकार होते. या दोन्ही पक्षांनी मिळून लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. राज्यातील लोकसभेच्या ५ जागांपैकी श्रीनगर, बारामुल्ला व अनंतनाग या जागा पीडीपीने जिंकल्या, तर जम्मू व उधमपूरमध्ये भाजपचे खासदार निवडून आले. सन २०१९ मध्ये तीनही पक्षांनी जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. नॅशनल कॅान्फरन्स व पीडीपीने जम्मू व उधमपूरची जागा काँग्रेसला सोडली. पण या दोन्ही जागा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन भाजपने जिंकल्या. काश्मीर खोऱ्यातील तीनही जागांवर नॅशनल कॅान्फरन्सचे उमेदवार विजयी झाले. गेल्या चार निवडणुकीत पीडीपीने एकदाच २०१४ मध्ये श्रीनगर व बारामुल्ला या लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. या मतदारसंघात २०१९ मध्ये पीडीपी तिसऱ्या क्रमांकावर गेली. काँग्रेसचा दोन्ही मतदारसंघात पराभव होऊनही २६ टक्के मते मिळवली. इंडियातील घटक पक्ष म्हणून आता कोण-कोणासाठी जागा सोडणार, हा जम्मू-काश्मीरमध्ये लाखमोलाचा सवाल आहे.

दिल्ली व पंजाबमध्ये इंडियाची मोठी कसोटी आहे. या दोन्ही राज्यांत आम आदमी पक्षाची सत्ता आहे. या दोन्ही राज्यांत मिळून लोकसभेच्या २० जागा आहेत. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीच्या सर्व ७ लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले होते. मोदी हटाओसाठी काँग्रेस व आप हे परस्परांचे राजकीय शत्रू इंडियामध्ये एकत्र आलेले दिसत असले तरी दिल्लीचे स्थानिक काँग्रेस नेते आपशी समझोता करण्यास मुळीच तयार होणार नाहीत. पंजाबमध्ये तर आप आणि काँग्रेस यांच्यात ३६चा आकडा आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. २०१९ मध्ये पंजाबमधून आपचा एकच खासदार निवडून आला होता. दिल्ली अध्यादेश मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने ‘आप’ला संसदेत पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी दिल्ली व पंजाबमध्ये स्थानिक नेते आपशी जुळवून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यातून लोकसभेवर ८० खासदार पोहोचतात. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपा, बसपा व राजद या तीन पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसला बरोबर घेतले नव्हते. पण तीन प्रमुख पक्षांनी एकत्र येऊनही या राज्यातून भाजपचे ६२ खासदार विजयी झाले होते. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलचे दोन खासदार निवडून आले होते. एनडीएला या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती व सपा, बसपा, राजद आघाडीला ४० टक्के मतदान झाले होते. उत्तर प्रदेशात एकाकी लढलेल्या काँग्रेस पक्षाला केवळ रायबरेलीतून एक विजय मिळाला होता. संपूर्ण राज्यात काँग्रेसला ६ टक्के मते मिळाली होती. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर सन २०१४ च्या तुलनेने २०१९ मध्ये एनडीएला ७ टक्के मते जास्त मिळाली. आता २०२४ साठी काँग्रेस, सपा, राजद हे तीन पक्ष इंडिया बॅनरखाली एकत्र आले आहेत. बसपाच्या सुप्रीमो मायावतींनी आपण स्वबळावर लढणार असे जाहीर करून टाकले आहे. ओमप्रकाश राजभर यांनीही एनडीएमध्ये प्रवेश केला आहेच. त्यामुळे मायावती व राजभर हे इंडियाचे गणित बिघडवू शकतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या निवडणुकीत केवळ एक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला ८० जागांचे वाटप करताना सपा, राजद किती जागा देणार, हा कळीचा मुद्दा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी- वड्रा हे तिघेही उत्तर प्रदेशातून लढणार असतील, तर त्यांना पारंपरिक मतदारसंघ सोडण्याची सपा व राजदची तयारी आहे का? जशी दिल्ली व पंजाबमध्ये स्थिती आहे, तशीच काँग्रेसच्या दृष्टीने पश्चिम बंगाल व केरळमध्ये आहे. या राज्यात मुस्लीम, ख्रिश्चनांसह अल्पसंख्य मतदार, डाव्या आघाडीचे मतदार आणि भाजपविरोधी मतदार अशी इंडियावाल्यांची सर्वांचीच ‘व्होट बँक’ समान आहे. भाजप विरोधी व्होट बँकेवर पश्चिम बंगाल व केरळमध्ये काँग्रेस, कम्युनिस्ट व तृणमूल काँग्रेस यांचा डोळा आहे. मग या व्होट बँकेसाठी इंडियात जागावाटप कसे होणार? पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा दबदबा आहे. या राज्यात डावे पक्ष व काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत.

सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसकडून १२ जागा खेचून घेतल्या होत्या. २०१४ मध्ये तृणमूलचे ३४ खासदार निवडून आले होते. २०१९ मध्ये २२ खासदारांवर समाधान मानावे लागले. २०१९ मध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकल्या, काँग्रेसचे केवळ २ खासदार निवडून आले. एकेकाळी भक्कम लालगड असलेल्या कम्युनिस्टांच्या पदरी निराशा आली. तृणमूलच्या विरोधात काँग्रेस व डावे एकत्र लढतात, असा आरोप तृममूल काँग्रेसचे नेते उघडपणे करीत असतात. मग ते या दोन पक्षांना पुरेशा जागा सोडतील का? केरळात २०१९ मध्ये काँग्रेसप्रणीत यूपीएने १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. कम्युनिस्ट पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला होता. अशा परिस्थितीत काँग्रेस डाव्या पक्षांना २०२४ मध्ये किती जागा सोडेल? सहा राज्यांत तेथील स्थानिक व प्रादेशिक पक्ष आपले वर्चस्व कमी करून काँग्रेसला जागा देण्याची शक्यता नाही. मोदी हटावची घोषणा देऊन २६ पक्ष इंडियाच्या बॅनरखाली एकत्र आले असले तरी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप ही सर्वांना मोठी डोकेदुखी आहे.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -