जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या चार तालुक्यात पुरस्थिती गंभीर
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
रत्नागिरी : कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस, नदी-नाले तुडूंब वाहत आहेत. पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. खेड आणि चिपळूण येथे पुराचे पाणी भरले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. खेड शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड-दापोली मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. या सगळ्यावर प्रशासन लक्ष देऊन असून आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.
रत्नागिरी-संगमेश्वर-खेड-चिपळूण आणि दापोली तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातील एसटी वाहतूकही कोलमडली आहे. यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची देखील मोठी अडचण झाली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra