
शिवसेनेच्या ४० आमदारांना दोन आठवड्यांची मुदतवाढ
मुंबई : विधीमंडळाच्या आमदार अपात्रता प्रकरणी उत्तर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena) ४० आमदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय लांबणीवर गेला आहे. आमदारांना खुलासा करण्यासाठी शेवटची संधी विधानसभा अध्यक्षांनी (Rahul Narvekar) दिली असल्याची माहिती मिळत आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणीला सुरुवात होणार आहे. नोटीसीचा खुलासा दिलेल्या आमदारांना त्यासंदर्भात पुरावे देखील सादर करावे लागणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय होणार नसल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे यासाठी ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना नोटीस दिली आहे. मात्र शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे. तसेच आणखी १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे बाकी आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने याचिकेत केला होता.