Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीUddhav Thackeray : तुम्ही सोनियासमोर लोटांगण घातले आणि राहुल गांधीच्या पाया पडलात,...

Uddhav Thackeray : तुम्ही सोनियासमोर लोटांगण घातले आणि राहुल गांधीच्या पाया पडलात, त्यांनी तुम्हाला काय दिलं?

आमदार संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीला मुजरा करावा लागतो असे बोलणा-या उद्धव ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री असताना दिल्लीत जाऊन सोनियांपुढे लोटांगण घातले आणि राहुल गांधींच्या पाया पडले, त्यांना त्यांनी काय दिले, असा थेट सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) केला आहे. तसेच आम्ही मातोश्रीवर यायचो तेव्हा तुमच्यासमोर झुकत होतो का? असाही उपरोधिक टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंकडून वारंवार टोमणे मारल्याचे पाहायला मिळते. उद्या होणाऱ्या मुलाखतीच्या टीझरमध्येही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीत जाऊन झुकावे लागत असल्याचा टोला लगावला आहे. त्यावर आक्रमक पवित्रा घेत शिरसाटांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या टीझरमध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपदाचा कारभार ज्या पद्धतीने चालवला हे सांगितले पाहिजे होते. पण ते टोमणे मारीत आहेत. त्याशिवाय त्यांना येतं तरी काय? आता टोमणे मारुन काय अर्थ आहे, लोकांना आता त्याची सवय झालीयं, त्यामुळेच सभेला गर्दी कमी होत असल्याचे शिरसाट म्हणाले.

तसेच केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केंद्रात जाऊन संवाद साधावा लागतो, त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह का घेता? तुम्हीही गेला होतात ना दिल्ली दरबारात? असेही ते म्हणाले. तुम्ही काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत जाऊन काय केलं? राहुल गांधींच्या पाया तुम्ही पडलात, त्यांनी तुम्हाला काय दिलं, असाही उपरोधिक सवाल त्यांनी केला आहे.

मुलाखतीच्या प्रोमामध्ये ठाकरे यांनी माझं सरकार वाहून गेलं नाही, तर खेकड्यांनी धरण फोडलं असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीला मुजरा करावा लागतो, उद्धव ठाकरेंची तुम्हाला भीती का वाटत आहे, मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर संपवा मग बघुया, उद्धव ठाकरे फक्त एकटा नाहीतर वडिलांचे आशिर्वाद आणि जनतेची साथ अन् समोर तुमची ताकद, असल्याचे ठाकरेंनी या प्रोमोमध्ये म्हटले आहे.

त्यावर बाळासाहेबांचे विचार सोबत असते, तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. बाळासाहेब समजायला शिवसैनिक व्हावं लागतं, मुलगा होऊन चालत नसल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. आता उद्या त्यांची मुलाखत होणार आहे, या मुलाखतीत ते टोमण्यांची किती मर्यादा गाठतात? हे पहावे लागेल, असे शिरसाटांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -