पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल!
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी विरोधी आघाडीच्या नावावर खरपूस समाचार घेतला. या बैठकीत पंतप्रधानांनी विरोधी आघाडी I.N.D.I.A. च्या नावाची तुलना ईस्ट इंडिया कंपनी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इंडियन मुजाहिदीनशी केली.
पंतप्रधान म्हणाले की, केवळ भारताचे इंडिया हे नाव बळकावून काहीही होणार नाही. इंडिया हे नाव ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीन यांनीही वापरले होते. इंडिया हे नाव पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) मध्ये देखील आढळते. इंडिया हे नाव लोकांची दिशाभूल करण्यासाठी ठेवण्यात आले आहे, परंतु लोकांची त्याद्वारे दिशाभूल होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंबहुना भाजपला आगामी लोकसभेत पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) असे नाव दिले आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), आणि शिवसेना (ठाकरे) हे तीन मुख्य विरोधी पक्ष सुद्धा या गटामध्ये सामील झाले आहेत.
पावसाळी अधिवेशनात मणिपूर प्रकरणावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत. त्यांना फार काळ सत्तेवर येण्याची इच्छा नाही, असे विरोधकांच्या वृत्तीवरून दिसत आहे. पावसाळी अधिवेशनातील संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती.