
मुंबई : मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती.
सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी शंभरहून अधिक मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. ३० हून अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.
जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी जयंत सावरकर यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. 'अपराध मीच केला' (गोळे मास्तर), 'अपूर्णांक', 'अलीबाबा चाळीस चोर', 'अल्लादीन जादूचा दिवा', 'आम्ही जगतो बेफाम', 'एकच प्याला' अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. 'एकच प्याला' नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली.