
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमधील (Pakistan) इस्लामिया विद्यापीठातील (Islamia University) ड्रग्ज आणि सेक्स स्कँडलने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जवळपास ५ हजार सेक्स क्लिप्स मिळाल्या आहेत. विद्यार्थीनींना ड्रग्ज देऊन त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्या अश्लील क्लिप काढण्यात आल्या आहेत. पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी एक विशेष रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर ड्रग्ज आणि सेक्स कांडाचा अड्डा बनल्याचे म्हटले आहे.
इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तपासासाठी ५ सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. सुरुवातीला पोलिसांना ड्रग रॅकेटचे पुरावे सापडले, परंतू ज्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडील अश्लील व्हिडीओ पाहून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. विद्यापीठाचा मुख्य सुरक्षा अधिकारी एजाज शाह याच्या मोबाईल फोनमध्ये तब्बल ५ हजार अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. एजाजकडे ड्रग्जही सापडले आहेत. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून विद्यापीठातील महिला अधिकारी आणि विद्यार्थिनींशी संबंधित अश्लील गोष्टी जप्त केल्या आहेत.
तसेच विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका कर्मचाऱ्यालाही अटक केली आहे. तसेच विद्यापीठातील ११३ विद्यार्थ्यांचे ड्रग्ज रेकॉर्ड समोर आले आहे. याची फॉरेन्सिक चाचणीही घेण्यात आली असून अधिकाऱ्यांनी हा अहवाल पंजाबच्या हंगामी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.