
काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री ?
नवी दिल्ली : बँकांकडून कर्ज वसुलीसाठी (Debt Recovery) अवलंबण्यात येणार्या पद्धतींविरोधात संसदेच्या (Sansad) आजच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना खडसावले आहे. कर्जवसुलीसाठी बँका सर्वसामान्यांना त्रास देत असल्याच्या प्रश्नाकडे विरोधकांनी आज संसदेत मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर निर्मला सीतारामन यांनी बँकांना 'मर्यादेत' राहून काम करण्याचा इशारा दिला आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'कर्ज वसुलीसाठी काही बँका लोकांशी अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. सरकारने अशा बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे आरबीआयला (RBI) स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सरकारी बँका असोत किंवा खाजगी बँका, त्यांनी कर्ज वसुलीसाठी कठोर पावले उचलू नयेत. कर्ज वसुलीसाठी जेव्हा सामान्यांशी संपर्क साधला जातो, तेव्हा माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवली पाहिजे.'
काही बँका लोकांकडून कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करतात. कर्जाच्या वसुलीसाठी अनेकदा बँकांकडून वारंवार फोन करुन धमकावले जाते, चुकीच्या पद्धतीने बोलले जाते किंवा घरी एजंट पाठवून लोकांसमोर अपमानित केले जाते. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचना बँकाकडून असे प्रकार केले जातात. मात्र यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली व त्यानुसार सर्व बँकांना 'मर्यादेत' राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्ज वसुलीबाबत आरबीआयने काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
- बँकेचा कर्ज वसुली एजंट ग्राहकाला सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच कॉल करू शकतो.
- एजंट ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणीच भेटू शकतो.
- ग्राहकाने विचारल्यास एजंटला बँकेने दिलेले ओळखपत्र दाखवावे लागेल.
- बँकेला ग्राहकांची गोपनीयता सर्वोच्च ठेवावी लागेल.
- बँकेला ग्राहकाचा शारीरिक किंवा मानसिक छळ करता येत नाही.
- एखाद्या ग्राहकासोबत असे घडल्यास, ग्राहक थेट आरबीआयकडे तक्रार करू शकतो.