- शब्दांकन : नंदकुमार पाटील
श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे बाहेर बऱ्यापैकी पावसाला वेग आलेला असतो. जिकडे-तिकडे हिरवाई दिसायला लागते. उत्साह, चैतन्य असे काहीसे वातावरण घरात, दारात असते. अशा पार्श्वभूमीवर कोणी लौकिकप्राप्त कलाकार आपले संपूर्ण आयुष्य, जीवनप्रवास, कला साधना उलगडून सांगणार असेल, तर ते आपल्याला हवे असते. ‘प्रहार’ने हेच निमित्त घेऊन प्रत्येक सोमवारचे ‘श्रावणसरी’ हे पान वाचकांसाठी बहाल केलेले आहे. पहिल्या पुष्पात अभिनेत्री, नृत्यांगना भार्गवी चिरमुले यांच्याशी संवाद साधला होता. आता दुसऱ्या पुष्पात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रा. विसूभाऊ बापट आपल्या भेटीला आलेले आहेत. मराठी कविताचे अभ्यासक, सादरकर्ते, निर्माते, सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.
काव्याची संकल्पना कशी पुढे आली?
एक तर लहानपणापासून मला कवितेची आवड होती. याचा अर्थ मी कविता करत होतो असे नाही. दुसऱ्यांच्या कविता मला वाचायला, सादर करायला आवडत होत्या. मी उत्तम कविता सादर करू शकतो, हे मला युवा अवस्थेत उमगले होते. पण पूर्णपणे कवितेवर आधारित कार्यक्रम करावा, असे ठरवणारे ते माझे वय नव्हते. प्राध्यापक म्हणून नोकरी करण्याचे ठरवले. त्यासाठी अर्थशास्त्र हा विषय मी घेतला होता. त्याला कारण म्हणजे मराठी शिकवण्यासाठी सर्वच प्राध्यापक पुढे सरसावत असतात; परंतु अर्थशास्त्र हा विषय जरा किचकट असल्यामुळे सहसा कोणी पुढाकार घेत नाही. मी तो विषय हाताळला. परिणामी मला लागलीच नोकरी प्राप्त झाली होती. पुढे ‘सत्यवादी’ या दैनिकात पत्रकारिता ही केली. त्याच कालावधीत मित्रमंडळीत, कवी संमेलनात सादरकर्ता म्हणून स्वतःला आजमावणे माझे सुरू झाले. कविता ऐकणाऱ्या प्रेक्षकांची मन जिंकायची म्हणजे आनंद देणारे, मन प्रसन्न करणारे कविता संग्रही असायला हवी ही संकल्पना पुढे आली. झोळीत इतर कागदपत्रांबरोबर कवितेची स्वतंत्र वहीसुद्धा दिसायला लागली. नवं आणि प्रसिद्ध कवींच्या हस्ताक्षरात असलेली ही माझी पंचेचाळीसावी कवितेची वही आहे. त्यावेळी वहीतल्या कवितांची पाने वाढली, सादरीकरणात नावीन्य आहे म्हणता म्हणता प्रेक्षकांची संख्याही वाढली. कार्यक्रमासाठी बोलवणे वाढले. विसूचा विसूभाऊ झालो आणि कार्यक्रम करायला काही हरकत नाही, हे मनाने पक्के केले. आता मागच्या आठवणीत डोकावता ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हे नाव कोणा रसिक प्रेक्षकाला माहीत नाही असे होणार नाही. आज ३०८८ प्रयोग झालेले आहेत. हे सांगताना आनंद होत आहे.
कार्यक्रमाचे नाव कसे सुचले?
‘मी अत्रे बोलतोय’ याचे सादरकर्ते सदानंद जोशी आणि ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रा. लक्ष्मण देशपांडे हे माझे गुरू आहेत. त्यांचे कार्यक्रम पाहिल्यानंतर मला ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाची संकल्पना सुचली. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या शीर्षकावरून ‘कुटुंब बसलंय काव्यात’ हे नाव प्रथम मी धारण केले. या नावाने काही प्रयोगही केले नाशिकला प्रयोग करीत असताना डॉ. अ. व. वर्टी यांना मी दिलेले शीर्षक काही आवडले नाही. ‘कुटुंब बसलंय काव्यात’ यापेक्षा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हे शीर्षक त्यांनी सुचवले आणि ते मला आवडले. पुढे ते कायम राहिले या कार्यक्रमाला प्रतिसाद इतका मिळाला मला प्राध्यापक आणि पत्रकारिता या दोन नोकरी सोडून मी सांस्कृतिक कार्यक्रमाचे महासागर असलेल्या मुंबईत दाखल झालो होतो. ते १९८६ साल होते. १९८१ पासून खऱ्या अर्थाने मी कार्यक्रमाला सुरुवात केली असली तरी मुंबईत दाखल व्हायचे असेल स्पर्धेतून स्वतःला सिद्ध करायचे असेल, तर अजून आपल्याला कवितेचा अभ्यास करायला हवा याचा मी ध्यास घेतला होता. सहा वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला. कवींना भेटलो. त्या त्या भाषेतली कविता जाणून घेतली. अर्थ मनात साठवून ठेवले. आता सलग पंचेचाळीस तास कविता सादर करू शकतो, इतका कवितासंग्रह माझ्याकडे आहे, म्हणण्यापेक्षा पाठांतर आहेत असे म्हणणे योग्य ठरेल.
सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल?
आजवर आश्रमातल्या शाळकरी मुलांसाठी विनामूल्य कार्यक्रम केले आहेत. नाही म्हटलं तरी बाराशेच्यावर कार्यक्रम केल्याची नोंद आहे. मुख्यमंत्री निधीसाठी काही प्रयोग सहकार्य तत्त्वावर केलेले आहेत. जे पूर्वीपासून स्वतःच्या कवितांचे कार्यक्रम करतात. त्यांच्या कविता शक्यतो मी माझ्या कार्यक्रमात सादर करत नाही. प्रस्तावितांच्या अप्रकाशित कविता हा माझ्या सादरीकरणाचा विषय आहे. त्यामुळे कधी न ऐकलेल्या कविता इथे सादर केल्या जातात. कवितेचा प्रचार व्हावा म्हणून अनेक कवींना मार्गदर्शन केले. पण कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ देणारा कोणी कलाकार पुढे येत नाही ही माझी खंत आहे. बहुभाषिक व्यक्तिमत्त्व म्हणून मला आज आचार्य अत्रे आदर्शवत वाटतात. त्यांच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेत मी सक्रिय आहे. दादर भागात अत्रेंच्या नावाने ‘अत्रे कट्टा’ चालवतो. त्यासाठी मी स्वतः विविध विषयांच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. शालेय मुलांना कवितेची आवड निर्माण व्हावी यासाठी विनामूल्य मी कार्यक्रम करत असतो. यानिमित्ताने कविता, मराठी भाषा, इंग्रजी भाषेचा आग्रह नको यासाठी प्रयत्न करीत असतो.
तुमच्या जागतिक विक्रमाचे काय झाले?
गेली बेचाळीस वर्षे मी मराठी कवितेचा प्रसार आणि प्रचार करतो आहे. कविता हा महाराष्ट्राला समृद्ध करणारा काला प्रकार आहे. महाराष्ट्रात जेवढ्या भाषा, तेवढ्या कविता असल्यामुळे त्यांची नावे घ्यायची झाली तरी एका दमात ती पूर्ण होतीलच असे नाही. मराठी काव्यप्रकाराची दखल विक्रमाची नोंद घेणाऱ्या पुस्तकात व्हायला हवी, असे मला वाटते. प्रथम सलग अकरा तास वेगवेगळ्या कविता सादर केल्या. नंतर हाच माझा विक्रम मोडणारा मी पंधरा तासांचा कार्यक्रम केला. त्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. पण ज्या गिनीज बुककडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. त्यात मराठी कवितेची नोंद व्हावी अशी माझी इच्छा होती. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या कार्यालयाशी मी संपर्क साधल्यानंतर कवितेसाठी खास वर्ल्ड रेकॉर्ड करणारा विभाग नाही, असे त्यांनी सांगितले होते. अमेरिकेतल्या एका महिलेने सात दिवसांत एकवीस प्रयोग वेगवेगळ्या नाट्यगृहात केल्याची नोंद आहे. त्यांचा विक्रम तुम्ही मोडल्यानंतर कदाचित गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तुमच्या नावाची नोंद होईल. त्यासाठी वेगळा विभाग निर्माण करायचा झाला, तर तुम्हाला स्वतःहून तो खर्च करावा लागेल. त्याप्रमाणे मी जुळवाजुळवही केली. नाशिकमधल्या आदिवासी शाळा प्रयोगासाठी निवडल्या. पण याचदरम्यान कोविडचे महासंकट जगावर आले आणि माझी ही इच्छा अपुरी राहिली. काही
झाले तरी मराठी कवितेची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी, असे मला आजही वाटते.
कवितांच्या पलीकडे काय?
मध्यंतरी बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते. नाटककार विद्याधर गोखले यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकाची मी निर्मिती केली होती. त्यात कामही केले होते. नागपूरला ‘झाडेपट्टी’ हा नाट्यकला प्रकार प्रचंड लोकप्रिय आहे. इथे या संगीत नाटकाचे प्रयोग व्हावेत असे मला वाटत होते. प्रयोगाच्या तयारीने आम्ही कलाकार मंडळी नागपूरला पोहोचलो. वस्तीपासून दूर अशा ठिकाणी हा रंगमंच होता. तिथेच राहून काही प्रयोग करायचे होते. मनःस्ताप यापलीकडे येथे काहीही होऊ शकत नाही, या कल्पनेने कोणी कलाकार प्रयोगासाठी उभा राहिला तयार नव्हता. परिणामी नाटकाचा प्रयोग काही झाला नाही. मी स्थानिक कलाकारांचा वाद्यवृंदाचा कार्यक्रम देऊन आयोजकाची समजून घालून त्यांचा हा प्रश्न सोडवला होता. हा धक्का मला इतका बसला की, मी पुन्हा नाट्य निर्मितीचा विचार केला नाही. सह्याद्री वाहिनीसाठी मी एका मालिकेची निर्मिती केली होती. त्यात मला फारसे यश आले नाही. ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाबरोबर सध्या मी आणि पत्नी, अभिनेत्री उमा बापट यांना सोबत घेऊन सही बोलना काही, शब्दांच्या पलीकडे, कुनबा जोडे कविताई हे तीन कार्यक्रम करतो. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ओमकार काव्य दर्शन, युवा स्पंदन हे कार्यक्रम करतो. काव्यनाट्यानुभव हा सर्वांचा विषय आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra