
सेरो (मणिपूर) : आदिवासी महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर (Manipur Violence) इम्फाळमधील कोनुंग मामांग येथे आणखी दोन कुकी समाजाच्या तरुणींवर जमावाने बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात आता हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून आणखी संतापजनक घटना समोर येत आहेत. ककचिंग जिल्ह्यातील सेरो गावात, एका स्वातंत्र्यसैनिकाची ८० वर्षीय पत्नी इबेतोम्बी यांना घरात बंद करून एका सशस्त्र गटाने घर पेटवून दिल्याने त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
इबेतोम्बी यांची नात प्रेमकांता हिने सांगितले की, तिचे कुटुंब तिला वाचवण्यासाठी धाव घेण्यापूर्वीच घराला आगीने संपूर्ण वेढले होते. घरावर हल्ला होणार हे लक्षात येताच त्यांनी आपल्या नातवंडांना पळून जाण्यास सांगितले तसेच नंतर परत या मला न्यायला, असे त्या म्हणाल्या. तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले.
स्वत: प्रेमकांता थोडक्यात बचावल्या. त्यांनी आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्या जखमी झाल्या.
इबेतोम्बी यांचे पती एस. चुरचंद सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते. ते ८० व्या वर्षी मरण पावले. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना सन्मानित केले होते.