इम्फाळ : दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार (Manipur Violence) समोर आला आहे. इम्फाळामधील कोनुंग मामांग येथे दोन कुकी समाजाच्या तरुणींवर जमावाने बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप पीडित तरुणींच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.
पीडित, २१ आणि २४ वर्षाच्या तरुणी होत्या. त्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोनुंग मामांग भागात कार धुण्याचे काम करत होत्या. ४ मे रोजी, राज्यात जातीय हिंसाचाराच्या उसळलेला असताना जमावाने त्यांना लक्ष्य केले. कार वॉश करताना दोन महिलांवर काही महिलांसोबत असलेल्या पुरुषांच्या मोठ्या गटाने हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ही घटना घडली त्यानंतर सुरुवातीला पीडित तरुणीचे कुटुंबिय कलंक लागू नये म्हणून पीडितांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. मात्र, एका मुलीच्या आईने याबाबत १६ मे रोजी सायकूल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अत्याचार केल्यानंतर या दोन्ही तरुणींची हत्या केल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण इम्फाळ जिल्ह्यातील पोरोम्पत पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले. अजूनही या तरुणींचे मृतदेह सापडलेले नाहीत, या प्रकरणी पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. यामुळे कुकी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीनुसार, काही महिलांनीच पीडित दोन तरुणींना एका खोलीत घेऊन गेले होते. त्यानंतर पुरुषांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी पाठबळ दिले. जवळपास तब्बल दीड तास पीडित तरुणींवर अत्याचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ओढत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना ठार मारुन फेकून दिल्याचे साक्षीदाराने सांगितले आहे. सुमारे २०० जणांच्या जमावाकडून हे अत्याचाराचे कृत्य करण्यात आले आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra